मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात (NCP MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांकडे या आठवड्यात सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि अनिल पाटील (Anil Patil) यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांची फेरसाक्ष नोंदवली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान 20 ते 25 जानेवारी दरम्यान फेरसाक्ष नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे. 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल दिला. त्यांनी भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवत एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला. तसेच त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे दोन्हीही आमदार पात्र असल्याचा निकाल दिला. त्यामुळे राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. 


निवडणूक आयोगाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार?


राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई ही सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा निकाल हा आयोगात देखील प्रलंबित आहे. पण तो निकाल कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान राजकीय वर्तुळात हा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, पण अद्यापही हा निकाल लागलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची धाकधुक सध्या वाढलेली आहे. 


 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सुरु असलेली  सुनावणी  आठ डिसेंबरला  पूर्ण झाली आहे. दोन्ही गटाच्या वकिलांच्या प्रतिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल राखून ठेवला होता. मात्र अद्याप निवडणूक आयोगातील ऑर्डर येणे बाकी आहे. त्यामुळे आता लवकरच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार की शरद पवार गटाला मिळणार हे स्पष्ट होणार आहे.  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीसंदर्भात लवकरच निकाल येऊ शकतो. 


हेही वाचा : 


राष्ट्रवादी कुणाची? घड्याळ कोणाला मिळणार? नेत्यांची धाकधूक वाढली, निवडणूक आयोगाचा निकाल येणार कुठल्याही क्षणी