NCP Leader Sharad Pawar : कुणाचाही अयोध्या दौरा हा राष्ट्रीय प्रश्न नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. देशातील महागाईचे, बेरोजगारीचे प्रश्न योग्यरित्या सोडवले जात नाहीत, त्यामुळेच धार्मिक मुद्दे पुढे रेटले जात आहेत, असं म्हणत केंद्र सरकारबाबत शरद पवारांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषेदत बोलताना म्हटलं आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाबाबत बोलताना न्यायालयाच्या निकालाबाबत गैरसमज झाल्याचंही पवारांनी बोलून दाखवलं. 15 दिवसांत निवडणुका घ्या, असं कोर्टानं सांगितलेलं नाही, तर 15 दिवसांत निवडणुकांच्या तयारीला सुरुवात करा, असं न्यायालयानं सांगितलंय असं मला वाटतं, असं पवार म्हणाले. 


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, "भीमा कोरेगाव प्रकरणानंतर त्यासंदर्भात चौकशी करणाऱ्या आयोगानं मला देखील समन्स काढलं होतं. त्यावेळी मला विचारण्यात आलं होतं. तेव्हा मी राजद्रोह या कायद्याबाबत बोललो होतो. राजद्रोहाचा कायदा हा ब्रिटिशकालीन 1890 सालचा आहे. एखाद्या प्रश्नबाबत सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याचा जनतेचा अधिकार आहे, म्हणून या कायद्याबाबत फेर विचार करण्याबाबत मी बोललो होतो. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत असेल तर चांगली गोष्ट आहे." 


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोर्टानं दिलेल्या निकालाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत कोर्टानं दिलेल्या निकालाबाबत अनेक गैरसमज झाले आहेत, असं मला वाटतं. कोर्टानं असं सांगितलंय की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत जिथून तयारी केली आहे, तिथून पुढे तयारी करा, असं मला वाटतं. 15 दिवसांत सुरुवात करा, असं कोर्टाने म्हटलंय असं मला वाटतं. मतदान प्रक्रियेला किमान 2 ते अडिच महिने लागतील. स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवाव्या, असं काही जणांचं मत आहे. तर काही जणांनी स्वतंत्र लढावं आणि नंतर एकत्र यावं, असं म्हणतात. याबाबत महाविकास आघाडीमध्ये याबाबत पूर्ण चर्चा झाली नाही."


कोणाचाही अयोध्या दौरा हा राष्ट्रीय प्रश्न नाही : शरद पवार 


राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारल्यावर यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, कोणाचाही अयोध्या दौरा हा राष्ट्रीय प्रश्न नाही. कोण अयोध्येला जाणार आहे, मला माहित नाही. माझा नातू देखील अयोध्येत आहे, हे मलाही माहीत नव्हतं. तसेच, पुढे बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी पक्ष म्हणून एकत्र येणार की, स्वतंत्र लढणार यावर बोलताना, सध्या तीन पक्षांचं सरकार आहे. प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असून यासंदर्भात आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावं लागेल. एकत्र बसून बोलून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. 


केंद्र सरकार विरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं : शरद पवार 


"हनुमान चालिसा म्हणून काही होत नाही. सामान्य लोकांचे प्रश्न बाजूला पडत आहेत. ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत, त्यांना प्रश्न सोडवता येत नाहीत. या सर्व मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी असले मुद्दे पुढे आणले जात आहेत. आज पेट्रोल आणि डिझेल याचे दर किती वाढले आहेत बघा. याबाबत लोकांनी चळवळ उभा केली पाहिजे.", असं पवार म्हणाले. तसेच, केंद्र सरकार विरोधात सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्याबाबतची प्रोसेस सुरू आहे, काँग्रेसचे देखील शिबीर सुरू आहे. आमच्या देखील बैठका सुरू आहेत, पण आमच्यात देखील मतभेद आहेत ते लवकर दूर केल्या पाहिजेत.", असंही शरद पवार म्हणाले.