नांदेड : दहशतवादी घटनेनंतर काँग्रेस सरकारने समर्थपणे परिस्थिती हाताळली होती, मात्र मोदींना ते जमलं नाही. छप्पन इंची छाती असताना रोज जवान मारले जात आहेत, असा घणाघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. नांदेडमधील महाआघाडीच्या पहिल्या संयुक्त प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मोदी सरकारवर निशाणा साधला.


नांदेडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी-रिपाई (गवई) गट, शेकाप व सीपीएमसह मित्र पक्षाच्या महाआघाडीची संयुक्त प्रचारसभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर महाआघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. शरद पवार यांनी पुलवामा हल्ल्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. अशा स्थितीत आम्ही एकीचं दर्शन घडवत होतो. गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत आम्ही सगळे उपस्थित होतो. मात्र त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभेत व्यस्त होते, अशा शब्दात त्यांनी मोदींवर टीका केली.

नोटाबंदी करताना दहशतवाद संपेल असं मोदींकडून सांगण्यात आलं होतं. मात्र दहशतवाद संपला का? छप्पन इंची छाती असतानाही रोज जवान मारले जात आहेत. नोटाबंदीचा फायदा काही झाला नाही मात्र देशातील जनतेला याचा खूप त्रास झाला. नोटबंदीमुळे गरिबांचा पैसा गेला. जीएसटीसारख्या निर्णयामुळे लाखो छोटे व्यापारी उद्धवस्त झाले, असं शरद पवार म्हणाले.

नोटाबंदीनंतर दहशतवादी हल्ल्यात वाढ झाली आहे. दहशतवादी घटनेनंतर काँग्रेस सरकारने समर्थपणे परिस्थिती हाताळली होती. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इतिहासच नाही तर पाकिस्तानचा भूगोलही बदलला, असं पवार म्हणाले.

आघाडी सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली होती. मात्र युती सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोपही पवारांनी युती सरकारवर केला. 'ना खाऊंगा ना खाने दुंगा' म्हणाणारे मोदी, मग 500 कोटीचा राफेल 1500 कोटींचा कसा झाला? वाढीव किमतीचे पैसे गेले कुठे?, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. राफेलचं भूत सरकारला गाडल्या शिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.

शहीदांना वाहिली श्रद्धांजली
या सभेच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी व्यासपिठावरील सर्व नेते आणि उपस्थितांनी मेणबत्ती जाळून दोन मिनीट स्तब्ध उभारुन श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान सभास्थळावरिल दिवे बंद करण्यात आले होते.