मुंबई : बालहट्ट पुरवण्यासाठी पालकांना काय काय करावं लागतं याचा काही नेम नाही. आपल्या लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी कधी त्यांच्या आवडीची खेळणी आणणं किंवा त्यांच्यासाठी विदूषक होणं अशा अनेक शकला आई- वडील लढवतात. हेतू एकच, मुलांच्या चेहऱ्यावर येणारं हसू. बालहट्टांपासून कोणीही आईवडील चुकले नाहीत. अगदी, राजकीय वर्तुळात दबदबा असणारी नेतेमंडळीसुद्धा.


सध्या राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ राजकीय नेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनाही असाच एक बालहट्ट पुरवावा लागला आहे. राजकीय विश्वात अनेक अगदी सहजपणे वावरणाऱ्या आणि इतरांशी मनमिळाऊपणानं वागण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित पवार यांच्यातील वडील नेमका आपल्या मुलाचे हट्ट करण्यााठी काय करतो, हेच त्यांनी नुकतीच लिहिलेली सोशल मीडिया पोस्ट सांगून जात आहे.


कधी मुलांसाठी खेळणी खरेदी करताना दिसणारे, एखाद्या भुर्जीच्या गाड्यावर कुतूहलानं भुर्जी बनवण्यासाठी पुढं जाणारे, कधी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारे आणि व्यग्र वेळापत्रकातून पत्नीलाही पुरेसा वेळत देत पावलोपाववली त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे रोहित पवार यावेळी त्यांच्या मुलाच्या हट्टापायी केस कापण्यासाठी गेले.





राज्याच्या सक्रिय राजकारणात योगदान देणाऱ्या पवार यांचा बराच वेळ हा दौरे, भेटीगाठी अशाच कामांमध्ये जातो. त्यामुळं कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी त्यांना फार कमीच मिळते. यावेळी त्यांना ही संधी मिळाली आणि "बाबा किती दिवसापासून मला भेटला नाहीत तुम्ही", असं म्हणत त्यांचा मुलगा शिवांश यानं त्यांच्याकडे आपल्यासोबत केस कापण्यासाठी येण्याचा हट्टच धरला. लाडाच्या मुलानं हट्ट धरला म्हटल्यावर तो पूर्ण करण्यावाचून आपल्याकडे कोणताच पर्याय नव्हता, असं म्हणत रोहित पवारांनीही शिवांशच्या चेहऱ्यावर हसू आणलं.
एक राजकीय नेता, पती, नातू, मुलगा आणि वडील अशा प्रत्येक भूमिकेला तितक्याच प्राधान्यानं न्याय देणाऱ्या रोहित पवारांनी या प्रसंगीसुद्धा सर्वांचीच मनं जिंकली. त्यामुळं हे युवा नेता पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेले आहेत हेच खरं.