सोलापूर : जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल उद्या जाहिर होणार आहे. मात्र मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागात 9 तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या निकालासाठी 9 ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. अक्कलकोट, मोहोळ, करमाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, बार्शी, माढा, मंगळवेढा या 9  ठिकाणांवर ही मतमोजणी होणार आहे. विजयी उमेदवार आणि पराभूत झालेले उमेदवार यांच्यामध्ये कोणताही वाद होऊन शांतता भंग होऊ नये यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात सोलापुर ग्रामीण पोलिस दलाच्या अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते.


मतमोजणीच्या ठिकाणी या गोष्टींना मनाई


भांदवि कलम 144 नुसार मतमोजणीला सकाळी 8 पासून रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश सोलापूर पोलिस आयुक्तालयाची हद्द वगळून उर्वरित भागात लागू असणार आहे. या आदेशानुसार मतमोजणीच्या संपूर्ण परिसरात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबत तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर, ज्वालाग्राही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू मतमोजणीच्या ठिकाणी घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणूक संबंधित अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे दोन अधिकृत प्रतिनिधी आणि पासधारक व्यक्ती यांच्या शिवाय कोणालाही प्रवेश करण्यास परवानगी नसणार आहे.


Gram Panchayat Election Result : गावगाड्यात एकच चर्चा, कुणाचा पॅनल बसणार! निकालाची प्रतीक्षा 


दरम्यान निवडणूकांच्या निकालानंतर विजयी उमेदवार आणि त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करत असतात. गुलाल उधळत विजयी मिरवणुका काढल्या जातात. मात्र या मधून पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवार तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या सगळ्या विजयी जल्लोषावर देखील निर्बंध लावले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी मिरवणूक किंवा रॅली काढणे, गुलाल उधळणे, घोषणे देणे, फटाके फोडणे, परवानगी शिवाय बॅनर किंवा फ्लेक्स लावणेस बंदी करण्यात येत आहे. असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे. सोबतच 18 जानेवारीच्या रात्री 10 पासून 19 जानेवारीच्या सकाळी 6 पर्यंत ग्रामीण हद्दीतील सर्व ढाबे. हॉटेल्स, पानटपऱ्या इत्यादी बंद ठेवण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.


ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.


ग्रामपंयात निवडणूक एक दृष्टिक्षेप
• निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
• प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
• एकूण प्रभाग- 46,921
• एकूण जागा- 1,25,709
• प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
• अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
• वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
• मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
• बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
• अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880