NCP :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या दृष्टीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारी पदाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांच्यावर सोपवली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी 'एबीपी माझा'ला पहिली प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे. तसेच यावेळी प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं की,  'माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही, तर दिलेली जबाबदारी पार पाडणं महत्त्वाचं आहे.' 


काय म्हणाले प्रफुल्ल पटेल? 


प्रफुल्ल पटेलांनी 'एबीपी माझा'ला पहिली प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'माझ्यासाठी नवी जबाबदारी येणं नवीन नाही. या गोष्टीचा आनंद नक्कीच आहे पण यामध्ये नवीन असं काहीच नाही.' पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'मी सुरुवातीपासून राष्ट्रीय पातळीवर पक्षासाठी काम केलं आहे, तसेच माझ्यावर जी जबाबदारी दिली ती देखील मी पार पाडली आहे.' सुप्रिया सुळे यांची देखील निवड करण्यात आल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं की, 'ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यांनी आतापर्यंत राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर खूप चांगले काम केले आहे.'  तसेच या विषयी कोणतीच पूर्वकल्पना नव्हती' असं देखील प्रफुल्ल पटेलांनी यावेळी सांगितलं.


शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला. यावर प्रफुल्ल पटेलांनी बोलतांना म्हटलं की, 'नवं नेतृत्व तयार करण्याची मानसिकता सध्या साहेबांची असावी. त्यामुळे मला पक्षाकडून मला मिळालेली जबाबदारी पार पाडणं जास्त महत्त्वाचं आहे.' राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्षाची मान्यता रद्द केल्यानंतर पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. यावर बोलताना प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं की, 'पक्षाला राष्ट्रीय दर्जा परत मिळवून देणं हे पहिलं आव्हान आहे. हा दर्जा परत मिळवून देण ही पक्षातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण आम्ही पुन्हा प्रगतीच्या मार्गावर नक्की येऊ.' 


आज दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. अजित पवार, छगन भुजबळ ही मंडळी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होती. परंतु या सगळ्यामध्ये लक्ष वेधून घेतलं ते सुप्रिया सुळे यांच्या अनुपस्थितीने. यावर प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं की, 'या सोहळ्याचे निमंत्रण सर्वांना देण्यात आले होते. परंतु त्यांना त्यांच्या मतदारसंघात देखील वर्धापन दिनाचा कार्यक्रम करायचा असेल. त्यामुळे त्यांना इथे उपस्थित राहणे शक्य झाले नसेल.'  


23 तारखेला पाटनामध्ये होणाऱ्या बैठकीत शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील यावेळी प्रफुल्ल पटेलांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेलांना मध्य प्रदेश, गोवा,गुजरात या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शरद पवारांच्या या निर्णयामुळे राजकिय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांना राज्याची जबाबदारी देण्यात आल्यानं अजित पवारांना डावललं गेल्याच्या चर्चा देखील आता रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता पक्षाची पुढची भूमिका काय असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या: 


NCP : प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष, शरद पवार यांची मोठी घोषणा