पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसने आम्हाला बुडवलं, राष्ट्रवादीचा थेट आरोप
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2016 01:05 PM (IST)
अकोला : काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ठ लावलं, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर केला. गेल्या पाच वर्षात काँग्रेसबरोबर राहिल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचं सर्वाधिक नुकसान झालं, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली. ते आज अकोल्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. देशातील आणि राज्यातील काँग्रेसचं वर्चस्व संपलं आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस स्वत:ही बुडाली आणि आम्हालाही घेऊन बुडाली, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. प्रफुल्ल पटेल यांच्या या टीकेमुळे आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद वाढण्याची शक्यता आहे.