Eknath Khadse : भाजपा (Bjp) सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी घेण्याबाबत शरद पवार (sharad pawar) आपल्याला सांगत होते. मात्र, आपण त्यावेळी त्यांचं एकलं नाही, ही आपली मोठी चूक झाल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं. त्यामुळं आपली पाच वर्ष वाया गेल्याची कबुली एकनाथ खडसेंनी दिली. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते जळगावमध्ये बोलत होते.
भाजप सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता पण...
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी घ्या असं शरद पवार यांनी आपल्याला सांगितले होते. मात्र आपण शरद पवार यांचं त्यावेळी एकलं नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. ही आपली चूक झाली असल्याची कबुली एकनाथ खडसेंनी दिली. भाजपमध्ये असताना 2019 मध्ये पक्षाने मला तिकीट दिले नाही. त्यामुळं माझी पाच वर्ष वाया गेल्याचे खडसे म्हणाले.
त्यावेळी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याबाबत शरद पवार मला सांगत होते. मात्र इतकी वर्ष भाजपचा विस्तार करण्यात घालवली होती. त्यामुळं पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात येत नव्हता. मी संभ्रम अवस्थेत होतो असेही खडसे म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
2020 मध्ये खडसेंनी केला होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी तिकीट दिले नव्हते. त्याची मुलगी रोहिणीताई खडसे यांनी भाजपने तिकीट दिले होते. या निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपमधीलच काही गद्दारांनी त्यांना पाडण्यासाठी काम केल्याचा आरोपही एकनाथ खडसेंनी केला होता. दरम्यान, त्यानंतर एकनाथ खडसेंनी शरद पवार यांच्या उपस्थितीत 23 ऑक्टोबर 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जर मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी घेतलं नसतं तर माझं राजकीय करिअर संपुष्टात आलं असतं असं खडसे म्हणाले होते.
मुक्ताईनगर मतदारसंघातून खडस सलग सहावेळा आमदार
1980 मध्ये खडसेंनी भाजपमध्ये सक्रिय राजकारणाला सुरुवात केली होती. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते.एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, 1987 मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (1989 – 2019) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.
महत्त्वाच्या बातम्या: