मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र जयंत पाटील यांनी या वक्तव्याबाबत ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारित केलं असल्याचं त्यांनी म्हटलंय.


ट्वीट करत जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन एका पेपरमध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये ही विनंती, असं त्यांनी म्हटलंय.


मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं पण...,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली इच्छा


कोणालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल
त्या व्हिडीओत बोलताना जयंत पाटील म्हणाले होते की, "दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्यामुळे मलाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. पण सध्याचं संख्याबळ लक्षात घेता ते आता शक्य नाही. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आले नाही." जयंत पाटील पुढे म्हणाले होते की, "राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजून पक्ष वाढवण्याची गरज आहे. सध्या आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या केवळ 54 आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. भविष्यात असे झाले तर पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हे अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, ते स्वाभाविक आहे." जयंत पाटील म्हणाले होते की, "मला जसे मुख्यमंत्री व्हावेसे वाटते तसे माझ्या मतदारांनाही मी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यात काही चुकीचं आहे असंही नाही. कारण मी शेवटी माझ्या मतदारांना जबाबदार आहे."


सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकच आहेत
तसेच मला मंत्रीपदापेक्षा राष्ट्रावादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष पद जास्त भावते अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे किंवा अजित पवार या दोघांपैकी एकाला पाठींबा देण्याची वेळ आल्यास कोणाला पाठींबा देणार या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, "मुळात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना वेगवेगळं समजणं चुकीचं ठरेल. ते एकाच घरातील आहेत."





व्हिडीओ: Jayant Patil | मलाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटणारच; मंत्री जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य