जळगाव : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याची माहिती स्वतः खडसे यांनी दिली आहे. आपली प्रकृती स्थिर असून कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी आपली तपासणी करून घ्यावी, मी लवकर बरा होऊन घरी परत येईल, असा विश्वास देखील खडसे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


मागील आठवड्यापासून खडसे यांच्या कुटुंबात त्यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर आणि त्यांचे पती आणि मुले पॉजिटिव्ह आली होती. रक्षा खडसे यांची दोन्ही मुलेही पॉजिटिव्ह आली होती. मात्र, त्यावेळी खडसे यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र, काही दिवसांपासून खडसे यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यावेळीपासूनच डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ते होते. मात्र, आता आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी स्वतः सांगितले असून मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती होणार आहेत.


शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द


ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात होता. या दौऱ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र, एकनाथ खडसे यांना डॉक्टरांनी क्वॉरटाईनचा सल्ला दिल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा दौरा रद्द करण्यात आला.


आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची बाधा


काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाची लागण झाली होती. या अगोदर मंत्री मंडळातील धनंजय मुंडे, एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, बच्चू कडू, अशोक चव्हाण, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील अनेक खासदार, आमदार कोरोना संक्रमित झाले आहेत.


Sharad Pawar | शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द, एकनाथ खडसे क्वॉरंटाईन असल्यामुळे दौरा रद्द