बीड : मला प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असं वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती जनसंवाद कार्यक्रमाअंतर्गत बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना म्हणाले होते. लागलीच मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. मला बहुजन समाजाला न्याय द्यायचा आहे, अशी भूमिकासुद्धा संभाजीराजे छत्रपती यांनी बोलून दाखवली होती. पण तरिदेखील त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं. अशातच आता संभाजीराजे छत्रपती  यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर चळवळीतील प्रश्नांना यश येतं. त्यामुळं मनातील प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये, असं धनंजय मुंडे म्हणाले. 


मराठा आणि ओबीसी आरक्षणावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार सक्षमपणे कोर्टात मराठा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी ताकतीने लढणार आहे. त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार उगीच वायफळ चर्चेला अर्थ नाही, असा टोला देखील धनंजय मुंडेंनी विरोधकांना लगावला आहे. ते परळी येथे परळी बायपास रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.


काय म्हणाले होते खासदार संभाजीराजे छत्रपती


जनसंवाद कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजी राजे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बीड शहरातील जनसंवाद कार्यक्रमाला संबोधन झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थितांना काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा असे सांगितले होते. त्यानंतर ओबीसी समाजातून आरक्षण का नको? असा प्रश्न एका तरूणाने विचारला. विशेष म्हणजे प्रश्न विचारणारा तरुण मोबाईलवर रेकॉर्डिंग करत होता, म्हणून  संभाजीराजे छत्रपती यांनी त्या तरुणाला हीच मागणी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाची असल्याचं सांगितलं. या प्रश्नानंतर जनसंवाद कार्यक्रमात काही काळ थोडा तणाव तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र प्रश्न विचारणाऱ्या तरूणाला छत्रपती संभाजीराजे यांनी व्यासपीठावर समोर उभं करून समजावून सांगितलं.


याच तरुणाच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "जो प्रश्न तुम्ही मला विचारताय, तोच प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. हा प्रश्न तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांनासुद्धा विचारला पाहिजे. पण तुम्ही तिथे विचारत नाही. मला विचारायचा असेल तर मला मुख्यमंत्री करा." असे यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले. मात्र हे वाक्य संपत असतानाच मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. मला बहुजन समाजाला न्याय द्यायचा आहे, अशी भूमिकासुद्धा यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी बोलून दाखवली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :