Dhananjay Munde : राजकारणामध्ये भाऊबंदकी नवी नाही. राजकारणामुळं अनेकांच्या घरांमध्ये दरी निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील अनेक कुटंबांमध्ये राजकारणामुळं दुरावा निर्माण झाला आहे. अशातच राजकीय संघर्षासाठी एकमेकांसमोर उभ्या राहिलेल्या मुंडे बहिण भावांमध्ये देखील बहिण भावाचं नातं राहिलेलं नाही. याची कबुली माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 


नेमकं काय म्हणालेत धनंजय मुंडे


आमचं आता बहीण भावाचं नात राहिलं नाही. आम्ही आता राजकीय वैरी आहोत. राजकारणातून नात्यात वैर निर्माण झालं असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. राजकारणामध्ये आम्ही आता एकमेकांचे वैरी आहोत. नातेसंबंध अगोदर होते असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. वारंवार त्यांच्याकडून (पंकजा मुंडे) वादग्रस्त वक्तव्य होत आहेत. याबाबत त्यांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला देखील धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिला.


 



विविध मुद्यांवरुन मुंडे बहिण भावांमध्ये संघर्ष


धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात विविध मुद्यावरुन सातत्यानं संघर्ष होत आहे. दोन्ही नेते ऐकमेकांवर टीका करत आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी पंकजा मुंडे या सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या कारभारावर टीका करत होत्या. धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळात बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाल्याची टीका देखील पंकजा मुंडे यांनी केली होती. तसेच बीडमध्ये भ्रष्टाचार इतका वाढला आहे की प्रत्येक काम पैसा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे सामान्यांची कामं रखडली जात असल्याची टीका देखील पंकजा मुंडे यांनी केली होती. 


2019 ला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा केला होता पराभव


दरवर्षी बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं. राज्यातील अत्यंत चुरशीची आणि सर्वांत लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडं पाहिलं जातं. या मतदारसंघात मुंडे-भावंडं आमने-सामने उभे ठाकतात. 2019 च्या विधानसबा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. त्यावेळी धनंजय मुंडे हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते होते. तर पंकजा मुंडे या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री होत्या. दोघेही चुलत भाऊ-बहीण असल्यानं या निवडणुकीला वेगळं महत्त्वं आलं होते.


महत्त्वाच्या बातम्या: