Dhananjay Munde : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी निवडणुकीसंदर्भात केलेल्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचं हे जनता ठरवत असते, असे धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. भगवान भक्तीगड सावरगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) पंकजा मुंडे यांनी मी आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे वक्तव्य केलं होतं. मी आता कोणतीही अपेक्षा करणार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.


धनंजय मुंडे नेमकं काय म्हणालेत


निवडणूक लढवणं हा लोकशाहीचा एक भाग आहे, ती लढवलीच पाहिजे. पक्ष जर संधी देत असेल तर कुठून निवडणूक लढायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचं हे जनता ठरवत असते अस धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. माहूरगडावर रेणुका देवीचं दर्शन घेण्यासाठी धनंजय मुंडे आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. लोकशाहीमध्ये प्रत्येकजण निवडणुकीची तयारी करत असतो, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यामुळं कोणी कोठून निवडणूक लढावी, किंवा निवडणूक लढावी की नाही ज्याचा त्याचा पक्ष ठरवेन शेवटी निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचं ही जनता ठरवत असते असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. 


पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या होत्या


छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि भगवानबाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख असल्याचे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केलं होतं. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, थांबणार नाही आणि कधीही कोणासमोर झुकणार नाही असेही त्या म्हणाल्या. आता आमदारांची यादी आली तर माझं नाव घेऊ नका, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी कोणावरही नाराज नाही. मी का नाराज होऊ. छत्रपती संभाजीराजेंचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यामुळं मी संघर्ष करत राहणार असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी आता कोणतीही अपेक्षा करणार नाही. मी आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. भगवान भक्तीगड सावरगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. 


महत्त्वाच्या बातम्या:


Pankaja Munde : मी कधीही कोणासमोर झुकणार नाही, आता 2024 च्या तयारीला लागा, पंकजा मुंडेंचा एल्गार