मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत बैठक झाली. शरद पवारांसह अजित पवार, श्रीनिवास पाटील, छगन भुजबळ असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाआघाडी आणि युतीबद्दल बोलत असताना संजय राऊत यांचा विषय आला असता अजित पवार म्हणाले की त्यांना संजय राऊतांचा बैठकीदरम्यान मेसेज आला होता.
यासांबंधी अजित पवारांना काहीच कल्पना नव्हती असं ते म्हणाले, पत्रकार परिषदेत त्यांना हा मेसेज पत्रकारांसमोर वाचूनही दाखवला. "नमस्कार, जय महाराष्ट्र मी संजय राऊत" असं त्या मेसेजमध्ये लिहिलं असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. "ते सिनियर आहेत तर त्यांना आता फोन करुन विचारेन मेसेजबाबत, आता मेसेज का केला आणि सत्तास्थापनेच्या संदर्भात बोलण्यासाठी केला का ते मला माहित नाही" असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
काय होता संजय राऊतांचा मेसेज?
राजकारणात सुरु असलेल्या चर्चेत मुख्यमंत्री कोण होणार हा विषय जोरदार रंगतोय. युतीचाच आपसांत वाद सुरु असल्याने शिवसेना मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडणार की देवेंद्र फडणवीस पदावर पाणी सोडणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
आता शिवसेना-भाजप नाही तर शिवसेना राष्ट्रवादीच्या जोडीचीही कल्पना सर्वांनी केली. दोन्ही पक्षांनी मात्र या कल्पनेला दुजोरा दिलेला नाही. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री होणार का, की शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे होणार अशीही चर्चा सुरु झाली. मात्र शरद पवारांच्या मुख्यमंत्री होण्याबाबतच्या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला आहे. शरद पवार मुख्यमंत्री होण्याची सुतराम शक्यता नाही असं ते म्हणाले.