पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार  ( Ajit Pawar ) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून मुंबईत बॅनर लागले आहेत. यावरून अजित पवार यांनी हे अतिउत्साही कार्यकर्त्यांचं काम असल्याचं म्हटलं आहे. "भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावले असतील तर त्याला जास्त महत्व देऊ नका, उद्या तुमचेही तसे फ्लेक्स लावले जाऊ शकतात, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ते पिंपरीत बोलत होते.


गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांचे सांगलीत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. तर आता अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून मुंबईत बॅनर लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "आमच्यात स्पर्धा नाहीत. तुम्ही खूप मनावर घेऊ नका, फार महत्व देऊ नका. जो पर्यंत 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. बॅनर लावणं हे त्या कार्यकर्त्यांचं वैयक्तिक समाधान आहे. हे अतिउत्साही कार्यकर्त्यांचं काम असतं. उद्या कोणी भावी पंतप्रधान म्हणून ही फ्लेक्स लावेल, पण बहुमत मिळाल्याशिवाय काही होत नसतं. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तारतम्य बाळगून बोलावं, असा सल्ला अजित पवारांनी दिला होता. त्यानंतर बावनकुळे यांनी अजित पवारांना 440 चा करंट देण्याचा पुनरुच्चार केला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, "जनता ठरवेल 440 चा करंट कोणाला द्यायचा. अशा फालतू गोष्टीत मला वेळ घालवायचा नाही."


एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 12 आमदारांच्या यादीवर सही करण्यासाठी आपल्याला धमकी देण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला. याचाही अजित पवार यांनी समाचार घेतला. "भगतसिंग कोशारी यांनी राज्यपाल असताना ते पत्र पब्लिश करायला हवं होतं. किंवा आत्ता ते बोललेत तर आता त्यांनी ते पत्र जाहीर करावं. मग ते वाचून जनतेला ही कळेल, असे अजित पवार यांनी म्हटंलं आहे.  


अजित पवार म्हणाले, "महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यासारख्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. हे प्रश्न महत्वाचे असताना काही तरी बोलून लक्ष विचलित केलं जात आहे.  


राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर होर्डिंग


मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर हे होर्डिंग लागलं आहे. "महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री..., एकच दादा, एकच वादा, अजित दादा..." अशा आशयाचा मजकूर या होर्डिंगवर लिहिलेला आहे.