मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. देशात सुरु असणाऱं शेतकरी आंदोलन ते सीरममध्ये लागलेलली आग या विषयांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. तर, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदावरील वक्तव्यावर पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली.


‘जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पण ते झाले का? उद्या मला वाटेल मुख्यमंत्री व्हावं; कुणी करणार का? जयंत पाटलांना मुख्यमंत्री व्हावसं वाटतं, मग त्यांना शुभेच्छा', असं शरद पवार म्हणाले.


काय म्हणाले होते जयंत पाटील?


जयंत पाटील यांनी एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. "राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजून पक्ष वाढवण्याची गरज आहे. सध्या आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या केवळ 54 आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. भविष्यात असे झाले तर पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हे अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, ते स्वाभाविक आहे", असं ते म्हणाले होते.


मला जसे मुख्यमंत्री व्हावेसे वाटते तसे माझ्या मतदारांनाही मी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यात काही चुकीचं आहे असंही नाही. कारण मी शेवटी माझ्या मतदारांना जबाबदार आहे, असं म्हणत त्यांनी संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं.


धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी करावी, हा निष्कर्ष योग्य होता- शरद पवार


धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. ज्यावरही प्रतिक्रिया देत शरद पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी करावी, हा निष्कर्ष योग्य होता अशी भूमिका स्पष्ट केली.


शेतकरी आंदोलनाबाबत म्हणाले...


कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी असल्याचं म्हणत कायदा रद्द करा आणि चर्चेला बसा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्राकडे केल्याची बबा पवारांनी यावेळी प्रकाशझोतात आणली. आपण यापूर्वीसुद्धा शेतकरी आंदोलनातील महत्त्वाच्या मंडळींशी चर्चा करुन त्यांच्याशी विचारविनिमय केल्याचं म्हणत दीड वर्षे कायदा स्थगित करण्याची मागणी शेतकऱ्यांना मान्य नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी दिली.