सोलापूर: केंद्र सरकारकडून राजकारणाचे सूडनाट्य सुरु असून क्रियेला प्रतिक्रिया देण्यात येत आहे. पण या गोष्टी मर्यादित ठेवणे आवश्यक असल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील म्हणाले. राज्यातील ठाकरे-राणे यांचे नाव न घेता राजकारणात सुरु असलेल्या सूडनाट्यावर जयंत पाटील यांनी भाजप-सेनेला खोचक सल्ला दिला आहे. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय प्रश्नात बोलणे टाळावे असाही सल्ला त्यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील म्हणाले की, "महाराष्ट्र कायम सर्वांचा आदर करून काम करणारे राज्य आहे. सर्वांना टोकाची भाषा बोलणे टाळले पाहिजे. सध्या राजकारणात दुसऱ्याचा सूड उगवणे हा नवा प्रकार दिल्लीतील नवे सरकार आल्यापासून सुरु झालेला आहे. त्यामुळे क्रिया-प्रतिक्रिया जास्त उमटायला लागल्या आहेत. दोन्ही बाजूने त्या मर्यादित ठेवल्या पाहिजेत आणि सार्वजनिक मर्यादांचे उल्लंघन आपण करू नये."
यावेळी केंद्रातील भाजप सरकारवर टीका करताना त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया देणाऱ्या राज्यातील सत्तेतील सहकाऱ्यांनाही जयंत पाटलांनी टोले लगावले. सध्या शिवसेनेतील ठाकरे विरुद्ध राणे संघर्षात सुडाचे राजकारण समोर येऊ लागले असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर अतिशय मार्मिक शब्दात वार करताना सार्वजनिक मर्यादांचे उल्लंघन करू नये असा मोलाचा सल्ला देखील दिला आहे.
अशोक चव्हाणांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देताना आघाडी सरकारमधील मित्र पक्षांनी एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देणे अयोग्य असल्याचे सांगताना फक्त हे पक्ष सोडणारे नेते भाजपमध्ये जाणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना जयंत पाटील यांनी दिली. गेल्या काही दिवसापूर्वी काँग्रेसचे काही पदाधिकारी राष्ट्रवादीत गेल्यावर काँग्रेसनेही राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता.
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा जयंत पाटील यांनी जोरदार शब्दात समाचार घेतला. जयंत पाटील म्हणाले की, "नाना पटोले यांनी माहिती घेऊन बोलावे. राष्ट्रीय प्रश्नाबाबत राष्ट्रीय नेत्यांना बोलू द्यावं. आपण स्थानिक असून आपल्याला दुसऱ्या राज्यातील परिस्थिती फारशी माहित नसते. याशिवाय ही बैठक काँग्रेसला धरून आहे कि सोडून आहे हेही माहित नसते."
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha