NCP Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) खिंडार पाडले. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल्ल पटेल, छगन भुजबळ, शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका झाल्यानंतर आता रोहित पवार यांनी मोर्चा उघडला आहे. आमदार रोहित पवार यांनी आज सोशल मीडियातून छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे-पाटील यांच्या आजपर्यंतची कुंडली मांडताना त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. त्यांना त्यांच्या आजवरच्या राजकीय आयुष्यामध्ये कोणकोणती पदे मिळाली आणि शरद पवारांनी प्रेम दिले याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. 


… हेच का आपलं वैचारीक अधिष्ठान?


रोहित पवार यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, मा. भुजबळ साहेब आयुष्यभर जपलेल्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर केवळ सत्तेसाठी आपण एका क्षणात पाणी सोडलं. हेच का आपलं वैचारीक अधिष्ठान?






जमिनीपेक्षा आपलं 'विमान' हवेतच जास्त असायचं


प्रफुल्ल पटेल यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, प्रफुल्ल्ल पटेल साहेब मा. पवार साहेबांच्या कृपेने तुम्हाला लोकांमध्ये जायची गरज फार कमी वेळा पडली...जमिनीपेक्षा आपलं 'विमान' हवेतच जास्त असायचं आणि बहुतेक वेळा केवळ फॉर्मवर सही करण्यापुरतंच आपलं काम असायचं..म्हणूनच तर तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही.






तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता


दिलीप वळसे पाटलांना  विचारणा करताना म्हटले आहे की, मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्यासारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती. असो! प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या #सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?