श्रीरामपूर : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला पडलेलं भगदाड दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक मोठे नेते पक्षाला रामराम करत भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या नेत्यांमध्ये पद्मसिंह मोहिते पाटील यांचाही समावेश आहे. मात्र पत्रकाराने पद्मसिंहांबद्दल प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार भडकले. "नातेवाईकांचा आणि ह्याचा काय संबंध?", असं म्हणत भर पत्रकार परिषदेतून जाण्यासाठी निघाले. अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हा प्रसंग घडला.

"नेते पक्ष सोडत आहेत मात्र आता नातेवाईकही दूर जात आहेत," या प्रश्नावर शरद पवार भडकले. "नातेवाईकाचा आणि या काय संबंध? पण तुम्ही नातेवाईकाचा काय विषय काढता? हे चुकीचं बोलताय तुम्ही, नातेवाईकाचा संबंध आहे का इथे राजकारणात? हे बघा, हे असं बोलायचं असेल, तर मला बोलायचंच नाही," असं म्हणत पवार जाण्यासाठी उठले.

यानंतर पवारांनी पत्रकाराला माफीही मागायला लावली. पवार पुढे म्हणाले की, "अशा लोकांना बोलवत जाऊ नका, ज्यांना सभ्यता नाही. माझी विनंती आहे, अशा लोकांना बोलवत जाऊ नका, निदान मला. यांना बोलवणार असाल, तर मला बोलावू नका. आपण निघून गेलात तर बरं होईल."

पाटील पितापुत्र भाजपच्या वाटेवर
राष्ट्रवादीच्या संस्थापकांपैकी एक असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आ. राणा जगजितसिंह पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यात आली असता, ते सहभागी झाले नव्हते. पद्मसिंह पाटील हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे मेहुणे आहेत. मोठे नेते पक्ष सोडून जात असताना आता जवळचे नातेवाईकही साथ सोडत असल्याचं चित्र आहे.