मुंबई : माजी सहकारमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईतील विधानभवनात पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित होते.



यावेळी बोलताना शरद पवार यांनी सध्या सुरु असलेल्या राज्यातील पक्षांतराबाबत चिमटा काढला. पवार म्हणाले, "काल रात्री माझं जीभ आणि गळ्याचं ऑपरेशन झालं आहे. डॉक्टरांनी मला काही दिवस बोलू नका असं सांगितलं आहे. मग म्हटलं सध्याचं राजकारण पाहता मी आज कार्यक्रमाला गेलो नाही तर पत्रकार छापतील मी गिरीश महाजन यांच्याबरोबर अमित शाह यांना भेटायला गेलो. म्हणून थोडा त्रास झाला तरी मी आलो". पवारांच्या या वाक्यानंतर सभागृहात एकच हशा पाहायला मिळाला.

शरद पवारांनी यावेळी बोलताना त्यांची पहिल्यांदा सभागृहात जाण्याची आठवणही सांगितली. "मी पहिल्यांदा सभागृहात आलो होते भाषण ऐकायला. सभागृहात पायावर पाय ठेवून बसू शकत नाही असा नियम आहे. मी चुकून दुसऱ्यांदा पायावर पाय ठेवला तर मर्शनले पकडून बाहेर काढलं होतं. त्यावेळी त्याला म्हंटल आता जातो पण नंतर येईन तेव्हा कायमसाठी. त्यानंतर राज्यात 26 वर्ष आणि देशात 26 वर्ष सभागृहात काम करायची संधी मिळाली", असं पवार यांनी सांगितले. तसेच "हल्ली सभागृहात वेगळाच पायंडा पाडला जात आहे. माझ्या संसदीय व विधिमंडळातील ५२ वर्षांच्या कार्यकालात मी कधीही माझा बाक सोडला नाही. संसदेची गरीमा सांभाळण्याची काळजी आम्ही घेतली. दुर्दैवाने आज तसे होताना दिसत नाही", अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

हर्षवर्धन पाटील यांनी देखील आपल्या भाषणात अनेक आठवणींना उजाळा दिली. 'सुरवातीच्या काळात नागपूर अधिवेशनात पवार साहेब तुम्ही प्रश्न विचारला, मी राज्यमंत्री होतो. तुम्ही सांभाळून घेतलं म्हणून मी हे पुस्तक लिहू शकलो', असं पाटील म्हणाले. तसेच 'मी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्यायला गेलो तर लगेच टीव्हीला पेपरला बातम्या आल्या. "विधानगाथा' गाजली.  गेली पाच वर्ष निवांत वेळ होता म्हणून पुस्तक लिहिले, पुढे असा निवांत वेळ मिळू नये अशी विनंती करतो', असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीला खिंडार, आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा राजीनामा