लखनौ : तुम्ही राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवू शकता तर मशिद बनवण्यासाठी ट्रस्ट का नाही बनवू शकत?, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला केला आहे. देश तर सगळ्यांचा आहे, सगळ्यांसाठी आहे, असंही पवार म्हणाले. शरद पवार बुधवारी लखनौच्या रविंद्रालयमध्ये आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या मेळाव्यात बोलत होते.


शरद पवार यावेळी म्हणाले की, विरोधी पक्षातील सर्व पक्षांनी मिळून भाजपच्या विरोधात निवडणूक लढवली पाहिजे. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार राज्यातील भारतीय जनता पार्टी (भाजप) चं सरकार लोकांना धर्माच्या आधारे वेगवेगळं करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.


ते म्हणाले की, ज्या प्रमाणे अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी ट्रस्ट बनवून आर्थिक मदत दिली जात आहे, त्याचप्रमाणे मशीद बनवण्यासाठी देखील ट्रस्ट तयार करुन आर्थिक मदत दिली जावी.

ममंदिरासाठी 15 सदस्यीय ट्रस्ट स्थापन, पुण्यातल्या 'या' महाराजांचाही समावेश

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले की, सर्व पक्षांनी राम मंदिर प्रकरणी एकच भूमिका घेतली होती. जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असेल तो मान्य केला जाईल. कोर्टाचा निर्णय आला आणि तो सर्वांनी मान्य देखील केला. शांतता आणि बंधुभाव सर्वांनाच हवा आहे. हा वाद कायमचा संपावा अशीच सर्वांची इच्छा आहे, असं पटेल म्हणाले.

 गोपाल दास यांची श्रीराम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड

दरम्याल, राम मंदिर निर्मितासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीत नृत्य गोपाल दास यांची श्रीराम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर विश्व हिंदू परिषदेच्या चंपत राय यांची महासचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. स्वामी गोविंद देव गिरीजी यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठरलं! असं असेल नवीन राम मंदिर, मंदिराची संरचना तयार

राम मंदिर निर्मितीसाठी समितीही तयार करण्यात आली आहे. नृपेंद्र मिश्रा या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. या समितीच्या अहवालानंतर राम मंदिर निर्मितीची तारीख निश्चित केली जाणार आहे. चंतप राय यांनी याबाबत म्हटलं की, अयोध्येतील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत श्रीराम ट्रस्टचं खातं खोललं जाणार आहे, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

रामनवमीला राम मंदिर निर्मितीला सुरुवात होणार नाही हे निश्चित झालं आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टची पुढील बैठक अयोध्या येथे पुढील 15 दिवसांच्या आत होणार आहे. बैठकीनंतर बोलताना परमानंद यांनी म्हटलं की, रामनवमीपासून राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात होणार नाही. जुन्या आराखड्यावर मंदिराचं बांधकाम सुरु होणार आहे. यासाठी कोरेलेल्या दगडांचा वापरही केला जाणार आहे.

श्रीराम मंदिर ट्रस्टच्या बैठकीनंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्वीट करत अध्यक्ष नृत्य गोपाल दास, महासचिव चंपत राय आणि कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांचं अभिनंदन केलं. 5 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत श्रीराम ट्रस्टच्या निर्मितीची घोषणा केली होती. श्रीराम मंदिर ट्रस्टची बैठक सुप्रीम कोर्टचे वरिष्ठ वकील परासरण यांच्या घरी झाली. के परासरण यांच्या घरचा पत्ताच श्रीराम मंदिर ट्रस्टचा स्थायी पत्ता आहे.

या बैठकीला के परासरण, महंत नृत्य गोपाल दास, अनिल कुमार मिश्रा, चंपत राय, गृह मंत्रालयातील अतिरिक्त सचिव ज्ञानेश कुमार, महंत दिनेन्द्र दासजी, जगद्गुरु शंकराचार्य वासुदेवानंद जी महाराज, धर्मदास जी महाराज, कामेश्वर चौपाल, राजा बिमलेंद्र मोहन मिश्र, अयोध्याचे जिल्हाधिकारी अनुज झा, पेजावर मठाचे पीठाधीश्वर विश्व प्रसन्ना आचार्य स्वामी आणि गोविंददेव गिरीजी महाराज उपस्थित होते.