पुणे : निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित करुन मतमोजणी केंद्राबाहेर काढलं, त्यानंतर पुन्हा दीड तासांनी बोलावून पराभूत असल्याचं सांगितलं, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीच्या पुण्यातील उमेदवार मनिषा मोहिते यांनी केला आहे.


मनिषा मोहिते यांचा पुण्याच्या प्रभाग क्रमांक 38, ‘क’मधून पराभव झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी विजय झाल्याचं सांगितल्यानंतर विजयी मिरवणूकही काढली आणि दीड तासांनी बोलावून मतमोजणीची सातवी फेरी बाकी असल्याने 244 मतं वाढली, असं कारण निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं. त्यामुळे 244 मतांनी पराभव झाला, असा दावा मनिषा मोहिते यांनी केला.

निवडणूक अधिकाऱ्यांकडून विजयी झाल्याचं कलम 149 अंतर्गत विजयी घोषित पत्रही देण्यात आलं. मतमोजणी केंद्रांवरील सर्व उमेदवारांना बाहेर काढलं, पण नंतर अचानक पराभव झाल्याचं सांगितलं. त्यामुळे ईव्हीएमध्ये घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



पुण्यात पराभूत उमेदवारांचा मोर्चा

महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत पुण्यात पराभूत उमेदवारांनी आंदोलन केलं. झाशीची राणी चौकात भाजप वगळता सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा काढली. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत ईव्हीएम मशिनवर प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले.

या आंदोलनामुळं जंगली महाराज रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. इथेच भाजपचं कार्यालय असल्यानं आंदोलक उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी करत या घोटाळ्याची चौकशीची मागणी केली.

आंदोलनानंतर सर्व पराभूत उमेदवारांची संभाजी उद्यानात बैठकही झाली. राज्यातल्या अनेक भागात ईव्हीएम मशिन्ससंदर्भात तक्रारी येत आहेत. त्यामुळं खरंच ईव्हीएम मशिन्समध्ये काही घोटाळा झाला का याचीच चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.

संबंधित बातमी : पुण्यात सर्वपक्षीयांकडून ईव्हीएमची अंत्ययात्रा


पाहा व्हिडिओ :