भंडारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ते भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


प्रफुल पटेल यांनी भंडाऱ्यामध्ये या भेटीबाबत म्हटले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही मार्ग काढण्यासाठी देखील दिल्ली दौऱ्यावर गेले असावेत.  काही राजकीय चर्चा, तीन पक्षांशी संबंधित काही बाबींवरील निर्णय अजूनही प्रलंबित आहे. मंत्रिमंडळ विस्तारही अजून रखडला आहे. अशा काही बाबतीत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले असावेत, असे पटेल यांनी म्हटले. 


मराठा आरक्षणाला विरोध नाही


प्रफुल पटेल यांनी मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नसल्याचे स्पष्ट केले. उलट सगळे पक्ष, सत्ताधारी व विरोधक म्हणतात की, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं. तो विषय हायकोर्टात टिकला होता. मात्र, सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर हा विषय परत रद्द करण्यात आला. आरक्षणाबाबत न्यायिक मार्ग कसा काढायचा, ही महत्त्वाची बाब आहे. आरक्षण द्यायचं की नाही, हा मुद्दा नाही. आरक्षण लगेच देता येईल पण मुद्दा न्यायपालिकेत नाही टिकला तर, परत कोणत्या समाजाची फसवणूक होता कामा नये. ही महत्वाची बाब असल्याचेही प्रफुल पटेल यांनी म्हटले. 


लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी चांगली संधी


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रात युवा संघर्ष यात्रा सुरू केली आहे. त्यावर पटेल यांनी संयमी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र किती मोठा आहे. महाराष्ट्राची व्याप किती मोठा आहे. महाराष्ट्रातील समस्या काय काय आहेत, हे अजून घेण्यासाठी ही एक चांगली संधी असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.