Sameer wankhede certificate :  एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा आता शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी वानखेडे यांचा जन्म दाखला सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यावेळी सोशल मीडियात व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे. या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे असा इशारा देखील वानखेडे यांनी दिला होता. त्यामुळे आज, गुरुवार सकाळपासून सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्या बाबत वानखेडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर समीर वानखेडे यांचं समीर दाऊद वानखेडे असं नाव असल्याचं पाहिला मिळत आहे. शिवाय यावर समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचं देखील निदर्शनास येत आहे. एक दाखला सेंट जोसेफ हायस्कूल वडाळा, तर दुसरा सेंट पॉल हायस्कूल दादर या शाळांचा आहे. त्यामुळे या दोन्ही दाखल्यांबाबत आणि यावर उल्लेख असलेल्या धर्मा बाबत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे काय भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत या दाखल्याबाबत उल्लेख केलाय. आपल्याकडील पुरावे कोर्टात दाखल केल्याचं यावेळी मलिक यांनी सांगितलं. 



दरमान्य एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी बोगस जातप्रमाणपत्र दाखवून शासकीय नोकरी मिळवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. याविरोधात वानखेडेंचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी जातप्रमाणपत्रावरुन नवाब मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. दुसरीकडे समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने समीर वानखेडेंच्या जन्माचा दाखला नुकताच सोशल मीडियात शेअर केला होता. कोर्टातील सुनावणी वेळी नवाब मलिकांनी बुधवारी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामार्फत वानखेडेंचा शाळेचा दाखला आणि इतर काही कागदपत्र देण्यासाठी परवानगी मागितली आहे. नवाब मलिक यांनी सोशल मीडियात समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला पोस्ट केल्यानंतर अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला सोशल मीडियावर पोस्ट केला होता. परंतु क्रांती रेडकरने काही वेळानंतर ती पोस्ट डिलीट केली. वानखेडेंच्या दाखल्याची पोस्ट मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाली आहे. क्रांती रेडकरने पोस्ट केलेल्या जन्म दाखल्यावर मुंबई महानगरपालिकेचा शिक्का असून महापालिकेमार्फतच दाखला काढण्यात आला असून दाखल्यामध्ये समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव वानखेडे असे नमूद करण्यात आले आहे.