गडचिरोली : नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत काल (बुधवार, 1 मे) भूसुरुंगाद्वारे स्फोट घडवून आणला. या स्फोटात 15 जवानांसह एक चालक शहीद झाला. कालच्या स्फोटांनंतर आज नक्षलवाद्यांनी सरकारला थेट धमकी दिली आहे. गडचिरोलीत पूल आणि रस्ते बांधू नका असे बॅनर उत्तर गडचिरोली भागात लावण्यात आले आहेत. उत्तर गडचिरोली डिव्हिजन कमिटीद्वारे अनेक गावांमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे.


बॅनर्सद्वारे एप्रिल 2018 मध्ये कसनसूर येथे झालेल्या 40 नक्षलींच्या एन्काऊंटरचा निषेध नोंदवण्यात आला आहे. 27 एप्रिल 2019 रोजी डिव्हीसी कॉम्रेड रामको नरोटी हीचादेखील पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. या घटनेचादेखील पोस्लटरबाजीद्वारे निषेध करण्यात आला आहे.

व्हिडीओ पाहा



दरम्यान बुधवारी गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. गडचिरोलीच्या सी-60 पथकातील जवान खासगी वाहनाने जात असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. महाराष्ट्र दिनीच नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालत मोठा घातपात घडवल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे. गडचिरोलीतील कुरखेड्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ हा भूसुरुंग स्फोट झाला.

नक्षलींना चकवण्यासाठी 15 जवान दोन खासगी गाड्यांनी जात होते. मात्र नक्षलींना याविषयी कुणकुण लागल्यामुळे त्यांनी हा हल्ला घडवल्याची शक्यता आहे. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती, की जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.