नागपूर : महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये अनेक नक्षली कारवाया करणारा नक्षल्यांचा म्होरक्या पहाडसिंग पोलिसांना शरण आला. छत्तीसगडमधील दुर्ग पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केलं. विविध राज्यांनी मिळून त्याच्यावर तब्बल एक कोटी रुपयांचं बक्षिस ठेवलं होतं.


पहाडसिंग गेल्या काही वर्षात गोंदियातील सीमा भागात सक्रीय होता. पहाडसिंग हा अशोक, टिपू सुलतान, कुमारसाय कतलामी, बाबुराव तोफा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात होता. चार राज्यात त्याच्यावर 80 गुन्हे दाखल असून जाळपोळ, हत्या, भूसुरुंग स्फोट यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. गडचिरोली पोलीस त्याची चौकशी करणार आहेत.

पहाडसिंगवर महाराष्ट्र पोलिसांनी 16 लाख, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात प्रत्येकी 25 लाख रुपयांचं इनाम होतं. पहाडसिंग हा नक्षल संघटनेचा विशेष विभागीय सदस्य होता, तर महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड समितीचा विभागीय सदस्यही होता. या तीन राज्यांसह ओदिशातील अनेक नक्षली कार्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.

*पहाडसिंग छत्तीसगडच्या राजनांदगाव मधील झुरिया गावचा रहिवासी होता. त्याला राजकारणात रस होता.
* 2002-03 मध्ये त्याची बायको सरपंच होती, पण मित्रांनीच अविश्वास प्रस्ताव आणला
* पत्नीचा पराभव झाल्यामुळे नाराज होऊन मित्रांना धडा शिकवण्यासाठी त्याने नक्षल जॉईन केले, पण बदला घेता आला नाही
* गडचिरोलीत 35 ते 36 गुन्हे दाखल
* पहाडसिंग आधी खोब्रामेंढा, नंतर तांडा दलममध्ये होता, गोंदिया बॉर्डरवरही तो सक्रिय होता
* परत ये, नक्षली चळवळ सोड असं पत्र  2013 मध्ये गडचिरोली पोलिसांनी त्याच्या वडिलांकडून लिहून घेतलं होतं