मुंबई : भारताच्या नक्षलवादाचे केंद्रस्थान तेलंगणा म्हणजे एकेकाळचे आंध्रप्रदेश ओळखले जात होते. मात्र याच तेलंगणाला नक्षलवाद नष्ट करण्यात यश आलंय.  त्याचप्रमाणे महाराष्ट्राची वाटचाल नक्षलवाद  मुक्त राज्याच्या दिशेने सुरू झालीय का? असा प्रश्न पडतोय. कारण मागील काही वर्षातली कामगिरी पाहता नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यातील संगठन नष्ट करण्यात यश आलेल आहे.  जाळपोळीच्या घटनांमध्ये, सामान्य नागरिकांच्या हत्यांमध्ये गेल्या वर्षभरात घट झाली आहे. 

माओवाद्यांना दिशा, निर्देश देणाऱ्या शहरी नेतृत्ववाला आळा घालण्यात महाराष्ट्राला यश मिळाले आहे . नर्मदाअक्का सारखे नेतृत्व हे कुठे वयामुळे थकले, तर हेम मिश्रा आणि प्रशांत राही सारखे प्रोफेशनल आणि नक्षली कुरियरचे काम करणारे देखील  पकडले गेले. तर अगदी वरावरा राव सारखे बुद्धिवादी समर्थक असो किंवा साईबाबा सारखा शीर्षस्थ छुपे नेतृत्व असो ते सुद्धा गजाआड गेले आणि त्याचा परिणाम एकंदरीत राज्यातील नक्षल चळवळीवर झाला आहे. 

वर्षागणिक नक्षलींचे बळी 

2006   39
2007 24
2008 15
2009 37
2010 32
2011 42

पण गेल्या पाच वर्षात हा आकडा कमी होत आला आहे. 

2018 09
2019 09
2020 05
2021 05
2022 06

इतकंच नव्हे तर गेल्या दोन वर्षात सुदैवाने एकाही जवानाला शहीद व्हावं लागलं नाही. फक्त मृत्यूच नव्हे तर जाळपोळीच्या घटनाही कमी झाल्या आहेत. 

जाळपोळीच्या घटनांमध्ये घट

2018 08
2019 12
2020 04
2021 03
2022 03

नक्षलवाद  मुक्त राज्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश येत असले तरी एखादी कारवाई, चकमक झाली की बरीच समीकरणं बिघडू शकतात.   महाराष्ट्राची नक्षली चळवळ  बाजूच्या छत्तीसगडच्या नक्षली चळवळीच्या भरोशावर  सुरु आहे हे नाकारता येणार नाही.