Temperature In Kolhapur : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून जवळपास पूर्णत: उघडीप दिली आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने ऑगस्ट संपण्यापूर्वीच चटके बसू लागले आहेत. कोल्हापूरमध्ये कमाल तापमानात वाढ झाली आहे. 


शनिवारी कोल्हापूर शहरात सुमारे अर्धा तास हलक्या पावसाची नोंद झाली. मात्र, दिवसाच्या बहुतांश भागात स्वच्छ सूर्यप्रकाश राहिला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कमाल तापमान 3 अंशांनी वाढून 29 अंश सेल्सिअसवर पोहोचले, तर किमान तापमान 21.7 अंश सेल्सिअसवर स्थिर होते. आज सकाळपासून कोल्हापूरमध्ये तापमान 29 अंश सेल्सिअस घरात असले, तरी 31अंश सेल्सिअस असल्याप्रमाणे वातावरणात जाणवत आहे. 


सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्येही पावसाचा जोर ओसरल्यानंतर कमाल तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी सांगलीत कमाल तापमान २९.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.३ अंश सेल्सिअस होते. साताऱ्यात कमाल तापमान 30.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20.9 अंश सेल्सिअस होते. सोलापुरात कमाल तापमान 33.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.6 अंश सेल्सिअस होते.


कोल्हापूर जिल्ह्यातील पूर ओसरला, राधानगरी धरणाचा एकमेव उघडलेला दरवाजाही बंद 


कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने पूरस्थितीतून सूटका झाली आहे. जिल्ह्यातील बंधाऱ्यांवरील पाणी सुद्धा झपाट्याने ओसरले आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 16 फुट 5 इतकी आहे. सध्या पंचगंगा नदीवरील रुई  आणि इचलकरंजी बंधाऱ्यावर पाणी  आहे, तर वारणा नदीवरील चिंचोली आणि तांदुळवाडी बंधारा पाण्याखाली आहे.  


कोयना धरणातून विसर्ग बंद


दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.


अलमट्टी धरणातून 42 हजार 500 क्युसेकने विसर्ग सुरु 


अलमट्टी धरण 100 टक्के भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. धरणामध्ये 40 हजार 11 क्युसेक्सने आवक सुरु असल्याने 42 हजार 500 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या