गडचिरोली : नक्षलवाद्यांनी संपूर्ण दंडकारण्यामधे 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत नक्षल शहीद सप्ताह निमित्त बंदच आव्हान केलं होतं. ह्या बंदच्या दरम्यान नक्षली मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असतात. कारण हा नक्षल सप्ताह नक्षल्यांसाठी मुख्य सप्ताह असतो. माओवादी नेता चारू मजुमदार, पेद्दी शंकर आझादसह चकमकीत ठार झालेल्या माओवादी नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माओवादी दरवर्षी शहीद सप्ताह साजरा करतात.


मात्र हा नक्षल शहीद सप्ताह यावर्षी नक्षल्यांवर भारी पडला आहे. कारण 28 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान गडचिरोली आणि छत्तीसगडमध्ये नक्षल विरोधी अभियानाच्या दरम्यान तब्बल 15 नक्षल्यांना ठार करण्यात सुरक्षा जवानांना मोठं यश आलं आहे.

 कुठे-कुठे झाली चकमक

नक्षल बंदच्या पूर्व संध्येला म्हणजे 27 जुलैला छत्तीसगड राज्याच्या बस्तरमधील जगदलपुर जिल्ह्यातील माचकोट जंगलात चकमकीत सात नक्षल्यांना कंठस्नान घातलं.  यात 3 महिला आणि 4 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश होता. या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य, शत्रसाठा हस्तगत करण्यात आला. या कारवाईत नक्षल कमांडरचा खात्मा करण्यात आला.

29 जुलैला गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात येणाऱ्या गरंजी पहाडावरील जंगल परिसरात मोठी चकमक उडाली. यात एका महिला नक्षलीला कंठस्नान घालण्यात सी-60 कमांडोना यश आलं होतं. या कारवाईत 4 ते 5 नक्षली गंभीर जखमी झाल्याचा पोलिसांचा अंदाज होता आणि मोठ्या प्रमाणात शत्रं व नक्षल साहित्यही मिळालं होतं.

3 ऑगस्टला सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव जिल्ह्यात येणाऱ्या महाराष्ट्रच्या सीमेवरील सीतागोटा व शेरपार च्या जंगलात मोठी चकमक उडाली. यात सात नक्षल्याना ठार करण्यात आलं. यात 4 पुरुष व 3 महिलांचा समावेश होता. या चकमकीत देखील मोठ्या प्रमाणात शत्रं हस्तगत करण्यात आली.

 दर्रेकसा एरिया कमिटीचा सफाया

वाघनदी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेरपार आणि सीतागोटा टेकड्यांवर झालेल्या पोलिस आणि नक्षल चकमकीत पोलिसांनी दर्रेकसा एरिया कमिटीचा सफाया करत पाच महिलांसह एकूण 7 नक्षल्यांना कंठस्नान घातले. उल्लेखनीय म्हणजे या नक्षल्यांवर छत्तीसगड शासनाने 32 लाखांचे पारितोषिक ठेवले होते. या घटनांमुळे नक्षल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये  दर्रेकसा एरिया कमिटीचा सचिव सुखदेव ऊर्फ लक्ष्मण (8 लाख बक्षीस), प्रमिला सुखदेव (5 लाख), सीमा (5लाख), मीना (5लाख), ललिता (2 लाख) शिल्पा (2 लाख) आणि रितेश (5 लाख) यांचा समावेश आहे.