औरंगाबाद : जपान, जर्मनीतून 500 रोबोट आले आणि औरंगाबादच्या ऑटो इंडस्ट्रीजचं स्वरूपच पालटलं. वाळूज, शेंद्रा यांसारख्या औद्योगिक क्षेत्राचा नवा अध्याय सुरू झाला आणि रोबोटच्या वेगामुळे उत्पादनातही वाढ झाली.


पूर्वी दिवसाला सुमारे दीड हजार रिक्षा तयार व्हायच्या, पण रोबोटमुळे आता या उत्पादनात हजाराने वाढ झाली आहे. उच्च तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अचूक असं प्रोडक्ट बनवायला मदत होत आहे. प्रत्येक रोबोटचा प्रोग्राम सेट करावा लागतो. फक्त 120 सेकंदाच्या अवधीत हा सांगाडा तयार होतो.

औरंगाबादेतले हे रोबोट थेट जपान आणि जर्मनीतून आणले आहेत. त्याची प्रत्येकी किंमत जरी 20 लाखांच्या घरात असली तरी रोबोटमुळे कामाचा दर्जा आणि वेग प्रचंड सुधारला आहे. अवजड कामांसाठी स्नायूबलापेक्षा रोबोटचा वापर वाढल्यामुळे अपघातांचं प्रमाण शून्यावर आलं आहे.

आगामी काळात माणसाच्या प्रत्येक कामात रोबोट असणार आहे. त्यामुळे केवळ रोजगारावर गदा येईल म्हणून रडत बसण्यात अर्थ नाही. कारण, रोबोटचे विविध फायदे लक्षात घेऊनच औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.