Tulja Bhavani Temple, Tuljapur Live darshan : आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. नवरात्रीचं पावन पर्व दुर्गामातेसाठी समर्पित आहे. देवी दुर्गेला शक्ती आणि उर्जेचं प्रतिक मानलं जातं. नवरात्रीत दुर्गेच्या सर्व नऊ रुपांची विधिवत पूजा अर्चा केली जाते. असं मानलं जात की, नवरात्रीच्या पावन पर्वात देवी दुर्गेची पुजा करून घटस्थापना केल्याने मनातील सर्व इच्छा आकांशा पूर्ण होतात.


कोरोनामुळं राज्यात सर्व मंदिरं बंद आहेत. नवरात्रीला सर्व देवींच्या मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी होत असते. मात्र आता कोरोनामुळं भक्तांविना नवरात्रउत्सव साजरा होत आहे. मात्र या स्थितीतही मंदिर संस्थानांकडून भक्तांसाठी लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तुळजापूरची तुळजाभवानी देवी मोठं शक्तिपीठ आहे. नवरात्रीला तुळजाभवानीच्या दर्शनाला मोठी गर्दी असते. यंदा मात्र केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थिती पूजाविधी होत आहे. मात्र तुळजाभवानी संस्थानाने भक्तांसाठी 24 तास आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्याची सोय केली आहे.


कोरोना महामारीमुळे यंदाचा नवरात्र उत्सव २०२० चा श्री तुळजाभवानी मंदिरात भक्ताविना मात्र प्रतिवर्षी प्रमाणे विधी, परंपरेने युक्त असा साजरा होणार आहे.  सदरील काळात तुम्ही ऑनलाईन दर्शनाद्वारे घरी बसल्या देवीजींचे नित्य दर्शन घेऊ शकता. त्यासाठी खालील युट्युब चॅनेल ला भेट द्या, असं तुळजाभवानी संस्थानने म्हटलं आहे.


इथं घ्या आई तुळजाभवानीचं दर्शन, 24 तास लाईव्ह



 344 दिवस देवी अष्टौप्रहर जागृत
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून 21 दिवस निद्रा घेते. उरलेले 344 दिवस देवी अष्टौप्रहर जागृत असते. निद्रा समयी देवीला 108 साड्यांचे वेष्टन (दंड नेसवने)केले जाते. व विधिवत् पलंगावर निद्रेसाठी ठेवले जाते.असे असणारे तुळजाभवानी शक्तीपिठ एकमेव द्वितीय आहे.देवीची मंचकी निद्रा 21 दिवसात विभागलेली आहे .मंचक याचा अर्थ पलंग असा आहे. नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती म्हणजे महिषासुराशी युध्द करण्यापूर्वीदेवी ही निद्रा घेत होती पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्म-विष्णू आणि महेश देवीला आठ दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात.या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केले या मुळे या निद्रेस घोर निद्रा म्हणतात.


असा असेल तुळजापूरचा नवरात्रोत्सव
०९-ऑक्टोबर-२०२० ते १७-ऑक्टोबर -२०२० -- श्रींची मंचकी निद्रेस प्रारंभ. सदरील आठ दिवस श्रींची निद्रा.

( शनिवार १७/१०/२०२० - नवरात्रारंभ, देवीची नित्योपचार अलंकार महापूजा )

( रविवार  १८/१०/२०२० - देवीची नित्योपचार अलंकार महापूजा व रात्रौ छबिना मिरवणूक )

( सोमवार १९/१०/२०२० - नित्योपचार अलंकार महापूजा व रात्रौ छबिना मिरवणूक )

( मंगळवार २०/१०/२०२० - रथ अलंकार महापूजा व रात्रौ छबिना )

( बुधवार २१/१०/२०२० - ललिता पंचमी, मुरली अलंकार महापूजा व रात्रौ छबिना )

( गुरुवार २२/१०/२०२० - देवीची शेषशाही अलंकार महापूजा व रात्रौ छबिना )

( शुक्रवार २३/१०/२०२० - देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा व रात्रौ छबिना )

( शनिवार २४/१०/२०२० - दुर्गाष्टमी , देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा व रात्रौ छबिना )

( रविवार २५/१०/२०२० - महानवमी , नवरात्रौत्थापन, होमवर धार्मिक विधी, सायं. सामूहिक सीमोल्लंघन )

( सोमवार २६/१०/२०२० - विजयादशमी दसरा,  उष:काली देवीची सीमोल्लंघन व मंचकी निद्रा )

( शुक्रवार ३०/१०/२०२०  - कोजागिरी मंदिर पौर्णिमा व रात्रौ लक्ष्मी - इंद्रपूजन )

( शनिवार  ३१/१०/२०२० - पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना व मंदिर पौर्णिमा व सोलापूरच्या काठ्यासह छबिना व जोगवा )

नवरात्रीच्या पुजेमध्ये नियमांचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. माता दुर्गा नियम आणि कडक शिस्तीसाठी ओळखलं जाणारं देवीचं रुप आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच, घटस्थापनेच्या दिवशी देवीची विधिवत पुजा करणं महत्त्वाचं ठरतं. नवरात्रीच्या पावन पर्वाच्या पहिला दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. असं म्हटलं जातं की, पहिल्या दिवशीची पुजा विधिवत केल्याने देवीचा आशिर्वाद मिळतो. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच, घटस्थापना करण्यासाठीच्या सर्व विधी आणि नियम जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.



घटस्ठापनेचा शुभ मुहूर्त


नवरात्रीच्या पावन पर्वाला आजपासून, म्हणजेच 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या दिवशी घटस्ठापना केली जाते. पंचागानुसार, शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घट स्थापन केले जातात आणि नवरात्राला आरंभ होतो. 17 ऑक्टोबर 2020, शनिवारी सकाळी 06 वाजून 27 मिनिटं ते 10 वाजून 13 मिनिटांपर्यंत घटस्थापन करण्याचा मुहूर्त आहे. देशभरात नवरात्राची धूम असते. शारदीय नवरात्रोत्सवाचे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळं महत्त्वा आहे. तसेच नवरात्रोत्सव साजरा करण्याची पद्धतही वेगळी आहे.


दरम्यान, नवरात्रोत्सवात अनेक भाविक देवीचा जागर करण्यासाठी उपवास देखील करतात. काही जण घटस्थापानेपासून पुढील नऊ दिवस उपवास करतात. यामध्ये काहींचा निर्जळी उपवास असतो, तर काही जण केवळ घट उठता बसता म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदा आणि अष्टमी, नवमी याच दिवशी उपवास करतात आणि दसर्‍याच्या दिवशी हे उपवास सोडले जातात.