Navneet Rana Ravi Rana At Nagpur For Hanuman Chalisa : मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणासाठी घराबाहेर पडलेलं राणा दाम्पत्य अर्थात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज 36 दिवसांनी अमरावतीत परतणार आहे. मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा हनुमान चालिसा पठणावरुन राजकीय रामायण पाहायला मिळू शकतं. कारण दिल्लीहून नागपुरात परतल्यावर राणा दाम्पत्य रामनगर परिसरातील मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहे. पोलिसांनी त्यांना काही अटी-शर्तींसह हनुमान चालिसा पठणाला परवानगी दिली आहे. मात्र त्याच मंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील हनुमान चालिसा पठणाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राणा समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सीआरपीसीच्या कलम 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे. लाऊडस्पीकरचा वापर करु नये, मंदिरासमोर अवास्तव गर्दी जमवू नये, प्रक्षोभक वक्तव्य करू नये अशा सूचना पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपुरातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तुरुंगवारीनंतर राणा दांम्पत्य पहिल्यांदा मतदारसंघात
तुरुंगवारीनंतर राणा दांम्पत्य पहिल्यांदा मतदार संघात येणार आहे. त्यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागताचं आयोजन केलं आहे. युवा स्वाभिमान पार्टीकडून त्यांचं भव्य जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. दिल्लीहून विमानानं नागपुरात दाखल झाल्यावर राणा दाम्पत्य पहिल्यांदा हनुमान मंदिरात चालीसा पठण करणार आहे. राष्ट्रवादी कार्यकर्तेही त्याच मंदिरात चालीसा पठण करणार आहेत.
जंगी स्वागत, समर्थकांची पोस्टरबाजी, राष्ट्रवादीची टीका
राणा दाम्पत्य दुपारी 3 वाजता नागपूरवरून अमरावतीकडे प्रयाण करेल. ते तिवसा, मोझरी, नांदगाव पेठ याठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केले जाईल. सायंकाळी 5.30 वाजता अमरावती शहरात आगमन झाल्यावर शेगाव नाका, इर्विन चौक, जयस्तंभ चौक आणि त्यानंतर राजकमल चौक, राजापेठ याठिकाणी त्यांचा जंगी स्वागत झाल्यावर सायंकाळी 8 वाजता बडनेरा रोडवरील दसरा मैदान येथील हनुमान मंदिर येथे हनुमान मंदिरात महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयसमोर राणा यांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरबाजीला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी ही दोन पैशाचे पोस्टर आणि आमचं तीन लाखाचं पोस्टर आहे, असं म्हटलं आहे. हे राणा बिना आमची काय बरोबरी करणार अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राणा दांपत्य कोणीही आपल्या राजकीय फायद्यासाठी आमच्या मंदिराला राजकीय आखाडा बनवू नका, असं मत रामनगर येथील हनुमान मंदिर व्यवस्थापन समितीने व्यक्त केले आहे. हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठणासाठी कोणालाही मंदिराच्या परवानगीची गरज नाही. मात्र राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी राजकीय स्टंटबाजी करू नये अशी अपेक्षा मंदिर व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे.