बुलढाणा: शिवसेना फुटीनंतर लागलेला गद्दार हा शिक्का पुसण्यासाठीच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना उभं केल्याचा गंभीर आरोप नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी केलं. ओबीसींच्या हक्काचं आरक्षण त्यांना मराठ्यांना द्यायचं आहे असा आरोपही वाघमारे यांनी केला. सिंदखेडराजा या ठिकाणी बोलताना त्यांनी हा आरोप केला.
ओबीसी आरक्षण बचाव उपोषण करणारे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे आज आपल्या उपोषणानंतर पहिल्यांदाच सिंदखेडराजा येथे आले. त्यांनी राजमाता जिजाऊंचा दर्शन घेऊन एका छोटेखानी सभेलाही संबोधित केलं. त्यावेळी नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यावर गद्दार हा शिक्का लागलेला आहे आणि तो कुठेतरी पुसला जावा म्हणून त्यांनी मनोज जरागेंना उभं केलेलं आहे. आमच्या हक्काचं आरक्षण त्यांना मराठ्यांना द्यायचा आहे, त्यामुळे या मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करायच्या असेही नवनाथ वाघमारे म्हटले.
ओबीसींच्या आरक्षणला कोणताही धक्का लागणार नाही असं राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी त्यांचे आंदोनल मागे घेतलं. त्यानंतर ते अभिवादन दौऱ्यावर निघाले आहेत.
नवनाथ वाघमारे म्हणाले की, "आमचा दौरा ओबीसी बांधवांशी संवाद साधण्यासाठी आहे. आता ओबीसी रस्त्यावर उतरलाय, आतापर्यंत मराठा समाजाचा त्यांच्यावर दबाव होता. बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे ही आमची प्रमुख मागणी आमची आहे."
आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ
लक्ष्मण हाके म्हणाले की, आज आम्ही निघालोय ओबीसींना एकजूट करायला. हा अठरा पगड जातींच्या महाराष्ट्र आहे या देशाला हेच दाखवायचं. कुणबी हे मूळचे ओबीसीमध्येच आहेत, कुणबी आणि मराठा एक होऊच शकत नाही. सुप्रीम कोर्टाने अनेकदा निर्णय दिलाय की कुणबी म्हणजे मराठा किंवा मराठा म्हणजे कुणबी एकच होऊ शकत नाही. त्यामुळे कुणबींच्या अधिकारावरसुद्धा मराठा हक्क सांगत आहे.
आम्ही ओबीसींचा आक्रोश सरकार समोर मांडत आहोत , गेंड्याच्या कातडीच्या सरकारला सांगत आहोत असं लक्ष्मण हाके म्हणाले. सरकारने जर न्याय दिला नाही तर उद्या आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जर सरकार आमचा अधिकार वाढवणार नसेल तर आम्ही निवडणूक सुद्धा लढवू असा इशाराही हाके यांनी दिला.
मनोज जरांगेचा बॅकग्राउंड चांगला नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी हाके यांनी केली. ओबीसी राजकीय नेत्यांना एकाच सांगेन की गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे असूनही ओबीसींसाठी लढले, त्यांचा आदर्श घ्यावा असं आवाहन लक्ष्मण हाके यांनी केलं.
ही बातमी वाचा :