मोर, कोल्हा, लांडगा, रानमांजर, हरिण, काळवीट आणि इतर प्राण्यांचं अभयारण्यात वास्तव्य आहे. हा डोंगराळ परिसर आहे. सध्या पाण्याअभावी अभयारण्यातील प्राण्यांचे खूप हाल होत आहेत. प्राणीमित्रांच्या मदतीने नवी मुंबईच्या मराठवाडा मित्र परिवार या संस्थेने पुढाकार घेऊन मयूर अभयारण्यातील प्राण्यांसाठी मोफत पाणी पुरवठा सुरु केला आहे.
सध्या या अभयारण्यात 12 पाणवठे आहेत. आगामी दोन महिने खूप महत्त्वाचे आहेत. मराठवाड्यातील नागरिकांप्रमाणेच प्राणीही जगायला पाहिजेत, याच हेतूने हा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशा कठीण परिस्थितीत एकत्र येण्याचं आवाहन मराठवाडा मित्र परिवारानं केलं आहे.
सध्या येथील पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे प्राण्यांचे बरेच हाल होत आहेत. सध्या मराठवाडा दुष्काळानं होरपळून निघत आहे. त्याची झळ माणसांसह मुक्या जनावरांनाही बसत आहे. नवी मुंबईतील मराठवाडा परिवारानं संवेदनशीलता जपत अभयारण्यातील प्राण्यांसाठी वॉटर टँकर पाठवून दिले आहेत.