परभणी : राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीचा पॅटर्न परभणी जिल्हा परिषदेतही यशस्वी झाला आहे. अध्यक्ष,उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे तर शिवसेना आणि काँग्रेसला सभापती पद अशी सत्तेची वाटणी करण्यात आल्याने मागच्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेच्या,नाराजीच्या नाट्याला पूर्णविराम मिळाला आहे. अध्यक्षपदी निर्मल विटेकर, उपाध्यक्ष अजय चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

परभणी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष आहे. त्यातच राज्यात महाविकास आघाडी झाल्याने इथेही एकत्र मिळून सत्ता स्थापन करावी असे पक्षाचे आदेश आले. मात्र जिल्हा परिषद ताब्यात असावी यासाठी राष्ट्रवादी चे आजी माजी आमदार यांच्यात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली.

विद्यमान अध्यक्ष माजी आमदार विजय भांबळे गटाचा असल्याने यावेळी पुन्हा आपलाच अध्यक्ष व्हावा यासाठी भांबळे आग्रही होते. परंतु बहुतांश सदस्य आणि स्थानिक नेत्यांच्या मर्जीमुळे तीन दिवस चर्चा झाल्यानंतर अध्यक्ष पद हे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या गटाच्या निर्मला विटेकर यांना देण्यावर एकमत झाले. परंतु सदस्य संख्येवर उपाध्यक्ष मिळावे यासाठी शिवसेनेने जोर धरला म्हणून माजी आमदार विजय भांबळे हे नाराज झाले त्यांनी किमान उपाध्यक्ष पद आपल्या गटाच्या सदस्याला मिळावे यासाठी पुन्हा पक्षश्रेठींकडे दाद मागितली त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी चे आमदार बाबाजानी दुर्रानी, शिवसेना आमदार राहुल पाटील आणि माजी आमदार विजय भांबळे यांच्यात आज सकाळी राहुल पाटील यांच्या घरी जवळपास तीन तास बैठक झाली.

भांबळे यांनी जास्तच आग्रह धरल्याने शवेटी त्यांच्या गटाचे अजय चौधरी यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली आणि शिवसेना व काँग्रेसला एक एक सभापती पद देऊन हि निवडणूक बिनविरोध करण्यावर तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे एकमत झाले. अर्ज दाखल करण्याच्या दहा मिनिट आधी अध्यक्ष म्हणून निर्मला विटेकर आणि उपाध्यक्ष म्हणून अजय चौधरी यांचे अर्ज दाखल झाले. पीठासीन अधिकारी डॉ सूचित शिंदे यांनी या दोघांची निवड झाल्याचे जाहीर केले आणि समर्थकांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला.