परभणीः दहशतवादी संघटनांची वक्रदृष्टी पुन्हा एकदा मराठवाड्यावर पडली असल्याचं दिसत आहे. कारण आयसिसशी संपर्कात असल्याच्या संशयावरून एटीएसने परभणीच्या नासिरबिन नावाच्या तरूणाला अटक केली आहे.
परभणीतील गाडीवान मोहल्ल्यातून नासिरबिन अबूबकर याफई उर्फ चाऊस या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. सोमवारी अचानक या मुस्लीमबहुल वस्तीत एटीएसचं पथक दाखल झालं आणि त्यांनी नासेरबिनला अटक केली.
कोण आहे नासिरबिन?
नासेरबिन हा दहशतवादी संघटना आयसिसच्या संपर्कात होता असा एटीएसचा आरोप आहे. रमजानच्या महिन्यात त्यानं मोठा घातपात घडवण्याचा कट आखला होता, अशी माहिती एटीएसच्या सुत्रांनी दिली आहे. नासिरबिनवर लावेलेले सर्व आरोप त्याच्या कुटुंबियानं फेटाळले आहेत.
पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असलेला नासिर बेन काही महिन्यांपूर्वी औरंगाबादच्या वैजापूरमधून परभणीत परतला होता.त्यांच्या कुटुंबियांची परभणीत शेती आहे. तसंच त्यांचा हॉटेलचाही व्यवसाय आहे.मात्र आयसिसच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून, नासिरला अटक झाल्यामुळं सगळ्यांनाच धक्काच बसला आहे.
एमआयएमचं अटकेविरोधात आंदोलन
नासिरबिनच्या अटकेविरोधात एमआयएमने परभणीत धरणं आंदोलन सुरू केलं आहे. दहशतवादी कारवायांबाबत मराठवाड्याचा इतिहास चिंताजनक आहे.
सिमी आणि इंडियन मुजाहिद्दीनसारख्या संघटनेनं बीड, लातूर, औरंगाबाद आणि परभणीमध्ये चांगलंच नेटवर्क तयार केलं होतं. आता मराठवाड्यावर आयसिसची वक्रदृष्टी पडलीय. इथल्या मुस्लिम तरूणांना आकर्षित करण्यासाठी आयसिसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आयसिसचा हा डाव उधळून लावण्याचं मोठं आव्हान तपास यंत्रणांसमोर उभं ठाकलं आहे.