Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत थेट लढत होणार आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज्यसभेची सहावी जागा आम्ही जिंकू असे म्हटले आहे. महाविकास आघाडीने एक प्रस्ताव दिला होता, मात्र त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे राज्यसभेची सहावी जागा आम्ही जिंकू, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. 


रामदास आठवले म्हणाले, "महापालिका निवडणूक सोडत झाली असून 23 वॉर्ड शेड्यूल कास्टसाठी सोडण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सर्वच महापालिकांची सोडत जाहीर झाली नसून भाजप सोबत महापालिका निवडणुका लढणार आहे. शिवाय इतर स्थानिक स्वराज संस्थेत देखील भाजप सोबत लढणार आहोत."


महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही
"महाराष्ट्र सरकार म्हणत होते की, जीएसटी मिळत नाही. परंतु, सर्व राज्यांसह महाराष्ट्राला देखील परतावा दिला आहे. अजूनही महाराष्ट्र सरकार म्हणत आहे की, आमचा परतावा राहिला आहे. त्यासाठी आम्ही  प्रयत्न करू.  केंद्राच्या सर्व योजनांचे पैसे महाराष्ट्रात आले आहेत. महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 


...राज्यात आम्ही सरकार बनवू
रामदास आठवले म्हणाले, "महाराष्ट्र सरकारमध्ये वाद आहेत. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद आहे. काँग्रेस पाठींबा ठेवायचा की नाही हे  ठरवत आहे. परंतु, काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पाठींबा काढावा, आम्ही राज्यात सरकार बनवू". 


"ऐक्यासाठी मी तयार"
रिपब्लिकन पक्षांचं ऐक्य होईल असं वाटत नाही, कोणाला नेतृत्व द्यायचं ते द्या, त्यासाठी मी तयार आहे. रिपब्लिकन पक्षांचं अनेक वेळा ऐक्य झालं आहे. आताही होईल पण सगळे गट एकत्र आले पाहिजेत. समाजाला वाटतं आंबेडकर, गवई, आठवले एकत्र आहेत. पण आंबेडकर येत नाहीत.  ऐक्यासाठी दोन पाऊलं मागे यायला मी तयार आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 


काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना इडीने नोटीस पाठवली आहे. यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, "नॅशनल हेरॉल्डबाबत त्यांनी कागदपत्रे पाहिली आहेत. त्याबाबत अनेक पेपर ईडीकडे आहेत. त्यामुळे त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नोटीस पाठवली होती. त्यात काही नसलं तरी राहुल गांधी यांनी उत्तरं द्यावं, यात पक्षाचा काहीच संबंध नाही."


रामदास आठवले म्हणाले, "हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून पाटीदार समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू उद्धव ठाकरे यांना नीट मांडता आली नाही. मराठा समाज सर्वच श्रीमंत नसून मराठा समाजाला आरक्षण देण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे."