नाशिक: शेतकऱ्यांवर गोळ्या चालवणाऱ्यांवर उन्हा- तान्हात संघर्ष यात्रा काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तुम्हीही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून, बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न केला, तर महागात पडेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.
नाशिकमधील शेवडी इथल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचं काम सुरु आहे. मात्र त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टींनी सरकारला इशारा दिला.
तुमचा हेतू शुद्ध असेल तर शेतकऱ्यांवर बळजबरी करण्याऐवजी, शेतकऱ्यांना विश्वासात घ्या, असा सल्लाही शेट्टींनी दिला.
शेतकऱ्यांची कळ काढली तर काय होतं हे जाणून घ्यायचं असेल, तर अजित पवारांना भेटा, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, " शेतकऱ्यांवर गोळ्या चालवणाऱ्यांवर उन्हा- तान्हात संघर्ष यात्रा काढण्याची वेळ आली आहे. त्यांच्या बुडाखालच्या खुर्च्या खाली झाल्या. ते 15 वर्ष होते. तुम्हाला तर आताच अडीच वर्षे झाली आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने घ्यायचा प्रयत्न केला तर महागात पडेल".
जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
समृद्धी महामार्गसाठी शेतकऱ्यांना धमकवणाऱ्या जिल्हाधिकारी बी. राधाकृष्ण यांनाही राजू शेट्टी यांनी इशारा दिला.
तुमच्या नावातला राधा कुठे आणि कृष्ण कुठे जाईल, असं राजू शेट्टी म्हणाले.