नाशिक: शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावत धुमाकूळ घातला. तासभर झालेल्या पावसामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. सकाळी कार्यालयात पोहोचण्याची आणि संध्याकाळी घरी जाण्याच्या घाईगडबडीत असताना अचानक आलेल्या पावसामुळे सगळाच खोळंबा झाला. नाशिक शहर आणि परिसरात बुधवारी पाच वाजेपासून जोरदार पावसाने सुरुवात केली. यावेळी गडगडाटी वादळासह जोरदार सरी सुरू झाल्या.


दरम्यान, रात्री साडेआठ वाजेपर्यंत 30.6 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. परतीच्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी झोडपून काढल्याने नाशिककरांची चांगली धावपळ उडाली. गेल्या आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. आकाश निरभ्र राहत होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सायंकाळी जोरदार सरी कोसळत आहेत. आज देखील शहरासह विविध उपनगरांमध्ये जोरदार पावसाला दुपारी तीन वाजता सुरुवात झाली. अवघ्या तासाभरात 21 मीमी पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यानंतर पुन्हा दोन तास पावसाने उसंत घेतली. दरम्यान सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा आकाशात ढगांची गर्दी झाली. गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह दमदार सरींचा वर्षाव झाला. संध्याकाळी आलेल्या पावसामुळे घरी परतणाऱ्या लोकांचे हाल झाले. नाशिक शहरातील गंगापूररोड, गिरणारे, सिडको, नाशिकरोड, पेठरोड, दिंडोरी रोड, मेरी म्हसरुळ परिसरात जोरदार सरींचा वर्षाव झाला.


दिवाळीच्या तोंडावर गजबजलेल्या शहराच्या उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये दुपारी आणि संध्याकाळी झालेल्या जोरदार सरींच्या आगमनामुळे धावपळ उडाली. तर विक्रेत्यांनी कापडाची शोधा-शोध करत पावसापासून आपल्या मालाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. दिवाळीचा हंगाम कॅच करण्याची संधी व्यवसायिकांपुढे असताना दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने व्यावसायिकांसह नाशिककरांचे नियोजन कोलमडले आहे.


दिवाळी खरेदी पाण्यात 


अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणावर पावसाचे संकट उभे ठाकले आहे. एकीकडे नाशिककरांची दिवाळी खरेदी सुरू असताना त्यांच्या खरेदीवर पावसाने पाणी फेरले आहे. त्यामुळे यंदाची निर्बधमुक्त दिवाळी पाण्यात जाते की काय असा प्रश्न सध्या नाशिककर विचारत आहेत.