नाशिक : नाशिकजवळच्या अवनखेड शिवारात पॉवर ग्रीडचा 300 फुटी मनोरा कोसळल्यानं 3 परप्रांतीय मजूर जखमी झाले आहेत. जखमींना दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जखमींपैकी एका मजुराची प्रकृती अत्यवस्थ आहे. शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली.
उभारणी सुरु असतानाच अचानक काही टन वजनाचा पॉवर ग्रीडचा भलामोठा टॉवर क्षणार्धात कोसळला. या टॉवरचं काम करणारे 3 मजुर या अपघातात गंभीर जखमी झाले. परिसरातल्या शेतकऱ्यांनी तात्काळ दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केलं आणि दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.
जखमीपैकी एका मजुराची प्रकृती अत्यवस्थ आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी आपली नाराजी खासदारांकडे व्यक्त केली.
सुदैवाने दुपारची वेळ असल्यानं शेतमजुरांची परिसरात वर्दळ नव्हती. अन्यथा जीवितहानी वाढली असती. शिवाय इतका अवज़ड टॉवर उभारताना निकृष्ठ दर्जाचं काम केलं जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नाशिकहून औरंगाबादपर्यंतच्या भागात सध्या पॉवर ग्रीडचे उच्चदाब वाहिनीचे टॉवर उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. सुरक्षा आणि नुकसानीच्या मुदद्यांवरुन सुरुवातीपासूनच या टॉवर्सला शेतक-यांनी विरोध केला आहे. मात्र शेतक-यांचा विरोध डावलून प्रशासनाकडून हे काम केलं जात आहे. या अपघातानं विरोध करणा-या शेतक-यांच्या आरोपांना बळ मिळालं आहे.