पंढरपूर : नाशिक ते पंढरपूर निघालेली सायकल वारी 600 सायकलस्वारांसह पंढरीत पोचली आहे. आषाढी यात्रेसाठी अनेक पालखी आणि दिंडी सोहळे पंढरीची वाट चालत असतात. आठ वर्षांपूर्वी पाच सायकल स्वारांनी सुरू अशीच एक सायकल वाली सुरु केली होती.
नाशिक-पंढरपूर असलेल्या या सायकल वारीत यावर्षी तब्बल 600 सायकलस्वार सामील झाले आहेत. यामध्ये आठ अंध सायकलस्वारांसह महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
यावर्षी नाशिक सोडल्यावर 9 वर्षाच्या प्रेमचा झालेल्या अपघाती मृत्यूमुळे या सायकल वारीचा उत्साह संपून गेला होता. आज दुपारी पंढरपूरमध्ये प्रवेश करताच चिमुकल्या प्रेमला श्रद्धांजली वाहून या वारकऱ्यांनी विठूमाऊलीचे दर्शन घेतले.
यंदाच्या वारीत अब्बास सह आठ अंध सायकलस्वारांनी नाशिक ते पंढरपूर ही 400 किलोमीटरची वारी पूर्ण केली. पंढरपूरला पोहचेपर्यंत कसलाच त्रास झाला नसल्याचे सांगत अब्बासने विठुरायाकडे दृष्टी मागणार असल्याचे सांगितले.
यावर्षी लैंगिक बाल अत्याचार आणि कॅन्सर या दोन थीम घेऊन सायकल वारी संपूर्ण मार्गात प्रबोधन करीत आली असल्याचं आयोजकांनी सांगितले. यंदा प्रेमच्या दुर्घटनेमुळे पंढरपूरमध्ये होत असलेले सायकल रिंगण रद्द करून श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.
लहान मुलांना समजेल असे वाहतुकीचे नियम पालकांनी समजावून सांगणे आवश्यक असल्याचे सांगत बेफान चालणाऱ्या वाहनांनी देखील वाहतुकीचे नियम पाळण्याची अपेक्षा महिला सायकलस्वारांनी व्यक्त केली. सलग आठ वर्षे नाशिक ते पंढरपूर वारी करणाऱ्या या सायकल प्रेमींचा गौरव आज विठ्ठल मंदिरात करण्यात आला.