नवी दिल्ली : राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र काँग्रेस आता विधानसभेच्या तयारीला लागलेली पाहायला मिळत आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरु केले आहेत.
काँग्रेसचे राज्यातील बडे नेते आणि राहुल गांधी यांच्यात याबाबत काल चर्चा झाली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा सूर उमटला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना सर्वाधिकार देण्यात आल्याची माहिती माणिकराव ठाकरे यांनी दिली.
येत्या 3 जुलैला काँग्रेसकडून वंचितसोबत चर्चेची पहिली फेरी होणार आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत बोलणं झालेलं असून ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न लोकसभेलाही केला होता. मात्र यावेळी त्यांचा प्रतिसाद काय येतो हे पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल, असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं.
राहुल गांधी यांच्या सोबतच्या या बैठकीला विजय वडेट्टीवार, शरद रणपिसे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, राजीव सातव आदी नेते उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसवर दबाव टाकण्यासाठी आधीच उमेदवार घोषित केले होते. आतादेखील वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचितसोबत आघाडी करायची असेल तर 20 जुलैची डेडलाईन दिली आहे. 20 तारखेपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीने संपर्क साधला नाही, तर वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर करणार असल्याचं आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं.