Nashik News: नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण प्राथमिक विभागातर्फे 100 मॉडेल स्कूल निर्मिती या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 100 मॉडेल स्कूलची निर्मिती पुढील काळात करण्यात येणार असून या शाळा तंत्रस्नेही करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श शाळा निर्मितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम मिशन - 100 आणि सुपर 50 या उपक्रमांच्या फलकांचे दादा भुसे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या मॉडेल स्कूलचा जिल्हाभरातील 100 शाळांमधील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
तसेच धोकादायक शाळांच्या इमारती नवीन बांधण्यात याव्यात. ज्या शाळांना देखभाल दुरूस्तीची आवश्यकता आहे. त्याबाबत योग्य नियोजन करून प्रत्येक शाळेत शुद्ध पिण्याचे पाणी, संरक्षक भिंत, स्वच्छतागृह इत्यादी कामे प्राधान्याने करण्यात यावीत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श शाळा निर्मितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम मिशन-100 सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत समन्वयासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात यावा. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. शाळांच्या विकासासाठी पदाधिकारी यांनी आवश्यक निधीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी दादा भुसे यांनी केले.
विविध विकास योजनांची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करा
नाशिक जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक वाडीवस्तीला शुद्ध पाणी पुरवठा होईल यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.
सप्तशृंगी तीर्थस्थळावरील विकासकामांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करा
पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, जलजीवन मिशन अंतर्गत गावांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देतांना गुणवत्तापूर्ण कामे करण्यावर भर देण्यात येवून गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. लघुपाटबंधारे विभागाच्या 2021-22 या वर्षातील उर्वरित कामांवरील स्थगिती उठविण्यात आली असून उर्वरित कामे पूर्ण करण्यात यावी. बांधकाम विभाग 1, 2 व 3 मधील कामांची तालुकानिहाय यादी सादर करण्यात येऊन त्यांचा स्वतंत्र आढावा घेण्यात यावा, अशा सूचना भुसे यांनी दिल्या. तसेच यात्रा स्थळ विकास योजनेच्या माध्यमातून वणी येथील सप्तशृंगी गडाला ब वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा प्राप्त झाला असल्याने तेथील विकास कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत विभागामार्फत पाठपुरावा करण्यात यावा.
विविध विकास कामांचा पालकमंत्र्यांनी आढावाही घेतला
ते पुढे म्हणाले की, मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेमधील प्रत्येक तालुक्यातील किमान 25 कामे सुरू करण्यात येवून डिसेंबर महिन्यात या कामांचा आढावा घेण्यात यावा. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत प्रलंबित असणाऱ्या सिंचन विहिरींच्या कामातील अडचणी लक्षात घेवून त्यावर उपाययोजना कराव्यात. समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थींनींना सायकल खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानापासून कोणतीही विद्यार्थींनी वंचित राहणार नाही, यासाठी नियोजन करावे. तसेच मानव विकास मिशन अंतर्गत ज्या तालुक्यांचा समावेश नाही तेथील विद्यार्थींनीसाठी ही योजना समाज कल्याण विभागामार्फत प्रभावीपणे राबविण्यात यावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. तसेच 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असणारे कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI