नाशिक : मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठा मोर्चानं आता राज्याच्या सुवर्ण त्रिकोणाकडे आपला मोर्चा वळवला आहे. नाशिकमध्ये आज मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबई-पुण्याच्या महामोर्चांची रंगीत तालीम म्हणून या मोर्चाकडे पाहिलं जात आहे. जिल्ह्याभरातून तब्बल 15 लाख नागरिक या मोर्चात सहभागी होतील, असा दावा आयोजकांकडून केला जात आहे.

या मोर्चाचा अभ्यास करुन विश्लेषण करण्यासाठी गुप्तचर यंत्रणेचं पथकही शहरात दाखल झालं आहे. राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, भाजप आमदार डॉ. अपूर्व हिरे, सीमा हिरे, शिवसेना आमदार अनिल कदम, योगेश घोलप असे राजकीय नेतेही या मोर्चात सहभागी होणार आहेत.

निर्भयाच्या नगरमध्ये मराठा मोर्चा, निर्भयाचे वडीलही मोर्चात


ज्या एका घटनेमुळे मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी पडली, त्याच घटनेचा काळिमा लागलेल्या अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी मराठा समाजानं क्रांती मोर्चाद्वारे भगवं वादळ उठवलं. विशेष म्हणजे कोपर्डीतील पीडित मुलीच्या वडिलांनीही या मोर्चात सहभाग घेतला. गरमधल्या मोर्चात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले होते.

मराठा मोर्चे कुठे कुठे निघाले?

औरंगाबाद (9 ऑगस्ट), उस्मानाबाद (25 ऑगस्ट), जळगाव (29 ऑगस्ट), बीड (30 ऑगस्ट), परभणी (3 सप्टेंबर), हिंगोली (17 सप्टेंबर), नांदेड (18 सप्टेंबर), जालना (19 सप्टेंबर), अकोला (19 सप्टेंबर), लातूर(19 सप्टेंबर), नवी मुंबई (21 सप्टेंबर) , सोलापूर (21 सप्टेंबर), अहमदनगर (23 सप्टेंबर), नाशिक (24 सप्टेंबर).

मराठा मोर्चे कुठे निघणार?

पुणे (25 सप्टेंबर), वाशिम (25 सप्टेंबर), बुलडाणा (26 सप्टेंबर), नंदुरबार (26 सप्टेंबर), सांगली (27 सप्टेंबर), धुळे (28 सप्टेंबर), बारामती (29 सप्टेंबर), सातारा (3 ऑक्टोबर) इथे मराठा समाजाचा मोर्चा होणार आहे.