नाशिक : जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले नाशिकमधील वैमानिक निनाद मांडवगणे अनंतात विलीन झाले. नाशिकमधील गोदाकाठावर भारतमातेच्या सुपुत्राला लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. भारत-पाकिस्तान तणावजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावताना स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे शहीद झाले.

निनाद मांडवगणे यांचं पार्थिव आज सकाळी डीजीपीनगर इथल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं. कुटुंबीयांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर पार्थिव बाहेर आणलं. यावेळी दोन वर्षांच्या चिमुकलीने आपल्या बाबांना अखेरचा निरोप दिला. हा प्रसंग पाहून तिथे उपस्थितांचं मन हेलावलं. निनाद यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे मोठा जनसमुदाय लोटला होता. यावेळी 'पाकिस्तान मुर्दाबाद' अशा घोषणा नागरिक देत होते. यानंतर डीजीपीनगरहून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली.



यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास हवाई दलाने निनाद मांडवगणे यांना मानवंदना दिली. मग लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील अंत्यदर्शनाला उपस्थित होते.

श्रीनगरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना, नाशिकचा पायलट निनाद मांडवगणे शहीद



निनाद मांडवगणे शहीद
नाशिकचे पायलट स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांचा बडगाममध्ये 27 फेब्रुवारीला हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई-वडील आणि धाकटा भाऊ असं कुटुंब आहे. निनाद हे औरंगाबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) 26 व्या कोर्सचे माजी विद्यार्थी होते. तिथून त्यांची निवड पुण्यातील एनडीएमध्ये झाली. त्यानंतर ते हेलिकॉप्टर पायलट बनले.

निनाद यांचा जन्म 1986 साली झाला होता. त्यांचे पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण भोसला मिलिटरीमध्ये तर अकरावी आणि बारावीचं शिक्षण औरंगाबादच्या सैनिकी संस्थेत झालं. नंतर त्यांनी बीई मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केलं. मग हैदराबाद ट्रेनिंग कमिशनमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, 2009 मध्ये भारतीय वायू दलात स्क्वॉड्रन लीडर पदावर रुजू झाले. गुवाहाटी, गोरखपूर इथे सेवा करुन एक महिन्यापूर्वीच श्रीनगर इथे त्यांची बदली झाली होती. पण तिथेच त्यांना वीरमरण आलं.

सोशल मीडियावर युद्धाच्या पोस्ट टाकणाऱ्यांना वीरपत्नीचा सल्ला  
"निनाद हा माझ्या आयुष्याचा भाग होता, राहणार आणि कायम आहे. आज आमच्या घरातून जवान गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरातून जवान जाईल. पण, माझी एक विनंती आहे, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांनो हे बंद करा. जर तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा आणि मग खरा अनुभव घ्या," असा सल्ला शहिद स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे वीरपत्नीने दिला आहे. तसंच "आम्हाला युद्ध नको, युद्धात काय नुकसान होतं, हे तुम्हाला माहिती नाही. आणखी निनाद जाता कामा नये," अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.