चिपळूण (रत्नागिरी) : राष्ट्रवादीचे नेते आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा रामराम केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचं कारण रमेश कदम यांनी अद्याप जाहीर केले नाही.


येत्या दोन दिवसात चिपळूणमध्ये राजकीय मेळावा घेऊन रमेश कदम आपली आगामी वाटचाल आणि भूमिका जाहीर करतील. मात्र, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

रमेश कदम यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. याआधी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून बाहेर पडून शेकापच्या तिकिटावर रायगडमधून अनंत गीते आणि सुनिल तटकरेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

रमेश कदम हे कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे गटाचे मानले जात होते. राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांचे ते कट्टर विरोधक मानले जातात.