नाशिक : मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरही आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे. नाशिक शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यात आटोक्यात असणारे नाशिक आता धोक्याची घंटा ठरू लागल आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे, एवढाच काय तो दिलासा. त्यामुळे एकीकडे सर्व व्यवहार सुरळीत सुरू करायचे आणि दुसरीकडे वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवायचे असे दुहेरी आव्हान प्रशासनासमोर आहे.
नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातून कोरोनाचा शिरकाव झाला. पहिला रुग्ण लासलगावमध्ये आढळला आणि तिथून पुढे एकापाठोपाठ एक रुग्णसंख्या वाढत गेली. मालेगावमध्ये तर कहरच झाला. दिवसाकाठी सरासरी 20 ते 25 रुग्ण आढळत गेले आणि नियंत्रणात असणारी परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जाऊ लागली. आता तीच परिस्थिती नाशिकची होत आहे. नाशिक शहरात शनिवारी दुपारपर्यंत 339 रुग्ण आढळून होते. त्यापैकी 116 पूर्णपणे बरे झाले असले तरी देखील 209 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात 80 प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत.
वडाळा गाव, खोडेनगर पेठरोड असे नवीन हॉटस्पॉट तयार होत आहे. वडाळा गाव नाशिक शहरातील सर्वात मोठे प्रतिबंधित क्षेत्र आहे. 4 हजार 700 घरांमध्ये साधारणत 25 हजार नागरिक राहत असून या भागात आतपर्यंत 21 रुग्ण आढळून आले आहेत. गावाच्या चारही बाजूने पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. मात्र तरीही गावात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीला 1484 जणांना कोरोनाची लागण झाली असून 89 जणांचा मृत्यू झालाय, तर 973 कोरोनामुक्त झालेत.
जिल्ह्याबरोबर नाशिक शहरातील अर्थव्यवस्था सुरळीत सुरू व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. बहुतांश नियम शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या वाढणार हे खुद्द प्रशासनातील अधिकारी सांगत आहेत. त्यामुळेच राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार शहरात सम आणि विषम या तत्वावर व्यवसायिकांनी आपली दुकाने सुरू करावी, असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी सर्व प्रमुख व्यापारी प्रतिनिधींची बैठक बोलावून त्यांना विश्वासातही घेतले. मात्र त्या नियमांच कुठेच पालन होत नाहीये. रस्त्याच्या दुतर्फा दुकाने सुरू असून रस्त्यावर नागरिकांची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे जोपर्यंत नागरिकांची संयमी साथ मिळत नाही, तोपर्यंत प्रशासनाचे सर्व प्रयत्न तोकडे ठरणार असून कोरोनाचा लढा आव्हानात्मक ठरणार आहे. त्यासाठी नागरिकांनी दिलेल्या सवलीतींचा लाभ घ्यावा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहान प्रशासनाकडून केल जात आहे.