नाशिकमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन दाम्पत्यासह दोन मुलांचा होरपळून मृत्यू
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 20 Feb 2019 12:09 PM (IST)
मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चौधरी कुटुंब झोपलेलं असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की संपूर्ण घर जळून खाक झालं.
नाशिक : सिलेंडरचा स्फोट होऊन कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात घडली आहे. दिंडोरीच्या धाऊर या गावी शेताच्या वस्तीवर मुरलीधर चौधरी हे आपल्या बायको आणि मुलासह राहतात. त्यांच्या भावाचा मुलगाही त्यांच्याकडे मुक्कामी आला होता. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चौधरी कुटुंब झोपलेलं असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की संपूर्ण घर जळून खाक झालं. विशेष म्हणजे सिलेंडरचेही दोन तुकडे होऊन ते घराबाहेर फेकले गेले. या घटनेत मुरलीधर हरी चौधरी आणि कविता मुरलीधर चौधरी या दाम्पत्यासह त्यांचा मुलगा तुषार मुरलीधर चौधरी आणि पुतण्या नयन कैलास चौधरी यांचा मुत्यू झाला आहे. चौधरी यांच्या घरात दिवा लावलेला होता, त्या दिव्याची ठिणगी पडली आणि गॅस सिलेंडर लिकेज असल्यामुळे स्फोट झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.