सातारा : साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाला शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजेंवर स्तुतीसुमनं उधळली.  'साताऱ्यात एकच राजे, डॅशिंग शिवेंद्रराजे'  अशा शब्दात पाटील यांनी शिवेंद्रराजेंवर स्तुतीसुमनं उधळल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.


VIDEO | शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील शिवेंद्रराजेंच्या भेटीला | सातारा | एबीपी माझा



शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या जावली मतदारसंघात अनेक कार्यक्रम सुरु होते. यातच मेढ्यातील एका कार्यक्रमाचा ताबाच युतीच्या नरेंद्र पाटील यांनी मिळवला. युतीचे नरेंद्र पाटील हे फॉर्म भरल्यानंतर ते थेट मेढ्यातील शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमस्थळी गेले. राष्ट्रवादीमय असलेल्या या परिसरात अचानक नरेंद्र पाटलांची एंट्री झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.  त्यावेळी त्यांनी शिवेंद्रराजे यांचा हात हातात घेऊन त्यांना मिठी मारत शुभेच्छा दिल्या.

आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा वाद मिटवल्याची घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली होती. यानंतर काही कार्यक्रमांमध्ये आमदार शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एका मंचावर दिसू लागले.

शिवेंद्रराजेंनी जरी आमच्यातील वैर संपल्याचे आणि आपण उदयनराजेंचे काम करणार असल्याचे भाषणातून सांगितले असले तरी मागचे दिवस पुन्हा आता पुढे दिसू लागले आहेत. उदयनराजेंच्या अनेक कार्यक्रमामध्ये शिवेंद्रराजे गैरहजर असल्याचे दिसून आले आहे.