पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याचा दाभोलकर हत्येशी संबंध?
एबीपी माझा वेब टीम | 16 Jun 2016 06:27 AM (IST)
मुंबई : गोव्यातील बॉम्बस्फोटामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा कट चार वर्ष लांबल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. आरोपी वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर यांना 2009 मध्ये दाभोलकारांची हत्या करायची होती, त्याचप्रमाणे पुणे पोलिस दलात कार्यरत असलेला एक अधिकारीही दाभोलकरांच्या कटात सामील असल्याचं समोर आलं आहे. गोव्यातील मार्गाव बॉम्ब ब्लास्टच्या कटापूर्वीच दाभोलकरांच्या हत्येचा कट शिजला होता. मात्र मलगोंडा पाटील आणि योगेश नाईक यांच्याकडून अपघाताने नियोजित ठिकाणाच्या आधीच बॉम्बचा स्फोट झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दाभोलकरांच्या हत्येचा कट पुढे ढकलल्याचं म्हटलं जातं. तेव्हापासून आरोपी अकोलकर परागंदा आहे. 2009 मध्येच दाभोलकरांची हत्या घडवून आणण्याचा दोघांचा इरादा असल्याचं तपासात पुढे आलं आहे. तावडेला गेल्या आठवड्यात पनवेलमधून अटक झाली होती. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक झालेला तो पहिला आरोपी आहे. हत्येसाठी तावडेची बाईक वापरण्यात आली होती. दाभोलकरांच्या अंधश्रद्धाविरोधी कार्यामुळे तावडेचा त्यांच्यावर राग असल्याचं म्हटलं जातं. त्याच शूटरने पानसरेंची हत्या केल्याचीही माहिती आहे. पुण्यात कार्यरत पोलिसाचाही हात : पुणे पोलिस दलात कार्यरत असलेला एक अधिकारीही दाभोलकरांच्या कटात सामील असल्याचं समोर आलं आहे. मुंबई मिरर वृत्तपत्राच्या बातमीनुसार हा अधिकारी सध्या सीबीआयच्या रडारवर आहे. वीरेंद्र तावडे आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्यातील कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत. विशेष म्हणजे या पोलिस अधिकाऱ्यानेच तावडेला शस्त्र पुरवल्याचं म्हटलं जातं. माजी (तत्कालीन) गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पोलिस दलातील अधिकाऱ्याचे संबंध असल्याची कोणतीही माहिती नाही, असं स्पष्ट केलं आहे.